“गणेशोत्सवाची परंपरा ही एक संस्कार आहे” : आ. शिरीषदादा चौधरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

“गणेशोत्सवाची आमची परंपरा ही एक संस्कार आहे आणि याचा एक विशेष आनंद आहे. श्री गणपती बाप्पा एक अशी देवता आहे, ज्याच्याकडे एकदा बघून त्याच्याशी प्रेम जडलं की तो आपलासा होऊन जातो. तिथे कुठलाही परकेपणा राहत नाही. त्यामुळे मनोभावे बाप्पाची आराधना आपसूक होते. मनातले भाव व्यक्त करता येतात आणि याचा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे”, अशी आठवण जेष्ठ आमदार शिरीषदादा चौधरी यांनी लोकशाहीच्या गणेश आरतीवेळी व्यक्त केली.

दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी आरतीसाठी ज्येष्ठ आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी, जळगाव जिल्हा गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, त्यांच्या पत्नी अपूर्वा नारळे, जैन उद्योग मीडिया समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, यांच्या पत्नी नीलम जोशी आणि मधुकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शरद महाजन उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली. यावेळी त्यांनी आठवणीतल्या गणेशोत्सवाच्या स्मरणिकांना उजाळा दिला.

जेष्ठ आमदार शिरीषदादा म्हणाले “सुमारे १९६९-७० ची गोष्ट आहे. आम्ही पहिल्यांदा घरी गणेशोत्सव साजरा केला. वास्तविक तशी परंपरा आधी नव्हती. बाबा (मधुकरराव चौधरी) हे शैक्षणिक कामानिमित्त परदेशी गेले होते. त्या काळात गणेशोत्सव करायचा हे मनात होतं. मात्र अशावेळी बाबा नसताना कोण मदत करणार, हा ही प्रश्न होता. नेमका पहिला गणपती, त्यात ही परिस्थिती. उत्साह होता मात्र आम्ही तेव्हा लहान होतो. तेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्टला बाबांचे तीन मित्र होते. आम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क करून मदत मागितली होती. ते तिथले प्राध्यापक होते. आमच्या आग्रहाखातर ते आले आणि त्यांनी आम्हाला मदत केली.”

“त्या काळात थर्माकोल हा प्रकार नव्याने सुरू झाला होता. त्यामुळे त्याचे विशेष कौतुक होतं. तेव्हा सुमारे एक दिवस आणि एक रात्र मेहनत करून आम्हा लोकांना हाताशी घेऊन त्यांनी सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. हा आमचा खऱ्या अर्थाने पहिला गणेशोत्सव होता कारण याआधी आम्ही कधीही गणपती बसवला नव्हता. ही आठवण आजपर्यंत कायम स्मरणात आहे. ते खूप सुंदर डेकोरेशन झालं होतं आणि ती परंपरा आजतागायत आमच्याकडे सुरू आहे. अगदी घरात दोन माणसे असले तरी आम्ही गणपती बसवतो. आता मुलगा धनंजय देखील आहे. त्यामुळे आता हा एक मोठा उत्सव वाटतो.”

यावेळी बोलतांना जळगाव जिल्हा गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे म्हणाले, “गणेश गणेशोत्सव हे एक जीवन विद्यापीठ आहे. एका काळात गणेशोत्सव काहीसा संकुचित झाला होता. मिरवणुकी देखील थांबल्या होत्या. त्यावेळी आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी डॉ. अविनाश दादा आचार्य, जयंतराव साळगावकर व प्रतापराव गोडसे यांना याबाबत कल्पना दिली. त्याला अनुसरून साळगावकरांचं श्री गणेशा विषयीचं, त्यामागच्या सांस्कृतिकतेच असलेलं ज्ञान यावेळी प्रचंड उपयोगात आलं. त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीच. त्यांनी त्यावेळी गणेशोत्सवाचं समजावून दिलेलं स्वरूप आजतागायत आम्ही विसरू शकलेलो नाही. ते म्हणत ‘एखादा उत्सव राहिला तर संस्कृती राहते, संस्कृती राहिली तर धर्म राहतो, धर्म राहिला तर राष्ट्र टिकून राहते, त्यामुळे ही संस्कृती वाहती राहिली पाहिजे, ती घडत राहिली पाहिजे.”

“आपल्याकडील सण उत्सवाची परंपरा ही निसर्गाशी जोडली गेलेली आहे. निसर्गाच्या हिरवाईत उत्सवांना मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. जसा जसा निसर्ग बहरतो तसेच सण उत्सव बहरत जातात. त्यांची निसर्गाशी बांधली गेलेली नाळ पाहता निसर्गाच्या अस्तित्वासाठी देखील हे सण उत्सव टिकून राहिले पाहिजे, ते जोपासले गेले पाहिजेत. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून याच धरणेने प्रयत्नशील आहोत आणि काही अंशी यशस्वी देखील झालो आहोत. त्या माध्यमातून कार्यकर्ता जोडला गेला तो अधिक प्रमाणात कार्यरत झाला. परिणामी कोविड काळात सुमारे सहा लाखांपर्यंत फूड पॅकेट याच माध्यमातून करण्यात आली.”

एका कटू आठवणीला उजाळा देत ते म्हणाले. “2017 मध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे जळगाव शहरात विसर्जनाच्या दिवशी कांचन नगर परिसरातला नाला फुटला. आम्ही त्यावेळी महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती करत होतो. नाला फुटल्यामुळे असंख्य नागरिकांच्या घरात ते पाणी वाहून जात होते. महामंडळाने त्यावेळी घेतलेला निर्णय फार महत्त्वाचा ठरला गणेशोत्सव विसर्जन एकीकडे होत राहील, मात्र नागरिकांवर ओढवलेली परिस्थिती ही फार मोठी मदतीची अपेक्षा होती. त्या धारणेतून 50 टक्के कार्यकर्त्यांना विसर्जनाच्या कामासाठी आणि पन्नास टक्के कार्यकर्ते प्रत्यक्ष फिल्डवर तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले होते. ही आठवण आजही अंगावर काटा आणते. मात्र त्यावेळी मदत केल्याचा अभिमान देखील आहे.”

यावेळी मधुकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शरद महाजन यांनी सांगितले की, “आम्ही लहानपणापासून श्री गणरायाचे स्थापना करत आहोत. श्री गणपती ही अशी विशेष देवता आहे जिच्याशी मनोभावे केलेल्या प्रार्थनेतूनच एक आत्मिक समाधान प्राप्त होत असते. मुळात गणेशोत्सवाच्या काळात पारिवारिक एकता दिसून येते. कारण बऱ्याचदा दूर गेलेले परिवार यामुळे जवळ येतात. त्यामुळे परिवार जोडण्यासाठी गणेशोत्सवासारखा उत्सव फार महत्त्वाचा आहे.”

जैन उद्योग मीडिया समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांनी यावेळी सांगितले की, “हे दहा दिवस प्रचंड आनंदाचे असतात. गणेशोत्सवात आनंद हा थेट घराघरात पोहोचलेला असतो. हा आनंद एकापेक्षा अनेकांच्या चेहऱ्यावर अधिक खुलून दिसतो. त्यामुळे आनंदाचा उत्सव म्हणून श्री गणेशोत्सव म्हणता येईल. पण कधी कधी परिस्थिती फार वेगळी असते. समाजात अजूनही कुठेतरी दरी आढळते. मुळात ही वास्तविकता उत्सवाच्या आनंदापेक्षा खरंच भयंकर आहे. आपल्या पदावरून आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो याचं एक आत्मिक समाधान मात्र कायम राहतं.”

 

शब्दांकन : राहुल पवार 

उपसंपादक

दै. लोकशाही

Leave A Reply

Your email address will not be published.