शिवाजी विद्यापीठाचा गांधी रिसर्च फाऊंडेशन सोबत सामंजस्य करार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गांधीवादी मूल्यशिक्षण या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच अनेक उपक्रम गांधी अभ्यास केंद्रामार्फत येत्या वर्षभरात राबविण्यात येऊ शकतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन यांच्यादरम्यान आज सामंजस्य करार झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फौंडेशनच्या वतीने संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल, असोशिएट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला आणि परीक्षा नियंत्रक गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, जळगावच्या गांधी संशोधन केंद्राला अर्थात गांधी तीर्थाला गतवर्षी भेट देऊन आल्यापासून या संस्थेसमवेत संयुक्तपणे काही उपक्रम राबविता येतील का, याविषयी चिंतन सुरू होते. त्यास आजच्या सामंजस्य कराराच्या रूपाने मूर्तरूप लाभले, ही समाधानाची बाब आहे. महात्मा गांधी यांचा मूल्यविचार, मूल्यशिक्षण आणि नई तालीम आदींवर आधारित दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक ई-कन्टेन्टची निर्मिती संयुक्तपणे करता येईल. विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षकांनी गांधीतीर्थ येथे जाऊन तेथील फेलोशीप सह शैक्षणिक बाबींचा लाभ घ्यावा. क्रमिक अभ्यासक्रमाच्या जोडीला गांधी विचारांवर आधारित कृतीशील उपक्रमही राबविले जावेत, त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेलाही सामावून घेतले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. गीता धर्मपाल म्हणाल्या, शिवाजी विद्यापीठासमवेत सामंजस्य करार होणे ही गांधी रिसर्च फौंडेशनसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठासमवेत फौंडेशनला संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेता येऊ शकतील. गांधींची प्रस्तुतता अधोरेखित करणारे विविध उपक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आदींचे आयोजनही करता येऊ शकेल.

यावेळी फौंडेशनच्या गिरीश कुलकर्णी यांनी गांधीतीर्थाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गांधी विचार संस्कार परिक्षा, नॅशनल गांधीयन लीडरशीप कँप, गांधीतीर्थ भेट आदी उपक्रमांच्या माध्यमातून गांधी अभ्यास केंद्राचे सक्षमीकरण करण्यास फौंडेशन मदत करू शकेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. अशोक चौसाळकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वाटचालीविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी तर गांधी रिसर्च फौंडेशनच्या वतीने संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. धर्मपाल यांनी स्वाक्षरी केल्या. सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. तर, फौंडेशनच्या वतीने कुलगुरूंना गांधी पुतळा आणि सुतीहार प्रदान करण्यात आला. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.