शेतकर्‍याचा प्रांत कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर तालुक्यातील नीम येथे प्रांत कार्यालयासमोरच शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे केळीचा बाग धुळीने उद्धवस्थ झाल्याची तक्रार करून देखील कारवाई न झाल्याने निम येथील शेतकऱ्याने प्रांत कार्यालयाबाहेर दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी दोर ताब्यात घेऊन शेतकऱ्याचे मतपरिवर्तन करून प्रांताधिकाऱ्यांसमोर हजर केल्याने यंत्रणेला कारवाईचे आदेश देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील निम येथील शेतकरी सुनील शिवाजी पवार याच्या गट न ५४ / ब मध्ये सहा बिघे क्षेत्रात केळी लावली आहे. मात्र त्यांच्या शेतातून वीट भट्टीसाठी माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जात असल्याने केळीवर धूळ बसून केळी खराब होत आहे. याबाबत शेतकऱ्याने तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र तहसीलदारांनी तलाठीला पाठवतो म्हणून आश्वासन दिले. तलाठी गेले पण माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर बंद झाले नाहीत.

शेतकऱ्याने पुन्हा प्रांताधिकारीकडे तक्रार केली. आणि ५०० ब्रास पेक्षा जास्त २-२ हजार ब्रास माती साठा झाला असून त्याही पेक्षा जास्त विटांचा माल पडला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली होती असेही शेतकऱ्याने सांगितले. प्रांताधिकारी यांनी देखील तलाठीला चौकशीला पाठवले. परंतु माती वाहणारे ट्रॅक्टर बंद झाले नाही. व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल घेण्यास नकार दिल्याने शेतकरी व्यथित झाला. त्याने दोर सोबत आणून प्रांत कार्यालयाबाहेर दोर बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे, अव्वल कारकून भूषण पाटील, शिपाई एकनाथ मैराळे, महेंद्र शिरसाठ यांनी त्याचा दोर ताब्यात घेऊन त्याचे मन परिवर्तन करून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्यासमोर हजर केले. प्रांत यांनी तहसीलदार मिलिंद वाघ याना बोलावून घटनास्थळी पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तर संबंधित तलाठीला नोटीस देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.