निवडणुकीचे एक्झिट पोल्स कसे केले जातात ?

अंदाज बरोबर ठरतात का?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दि. 1 जूनला देशातले सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यावर  2024च्या निवडणुकीमधली मतदान प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर लक्ष असेल ते 4 जूनला होणारी मतमोजणी आणि निकालाकडे. पण 1 जूनला मतदान झाल्यानंतर सगळ्या एजन्सीज आणि न्यूज चॅनल्स यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल्स काय आहेत, हे एक जूनला समजेल. पण त्याआधी या एक्झिट पोल्सबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ.  एक्झिट पोलबद्दल समजून घेण्यासाठी निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज चे सहसंचालक प्राध्यापक संजय कुमार यांच्याशी चर्चा केली.

 

एक्झिट पोल म्हणजे काय आणि ते कसे करतात?

एक्झिट म्हणजे बाहेर पडणे. हा शब्दच या चाचण्या म्हणजे पोल्सबद्दल खूप काही सांगतो. जेव्हा मतदार निवडणुकीसाठी मत देऊन केंद्रामधून बाहेर पडत असतो, तेव्हा त्यांना विचारले जाते – तुम्ही कोणत्या पक्षाला वा उमेदवाराला मत दिले, हे सांगाल का? एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभे करतात. जसजसे मतदार मतदान करून बाहेर येतात, त्यांना विचारले जाते की त्यांनी कुणाला मत दिले. इतरही काही प्रश्न त्यांना विचारले जातात. उदा. पंतप्रधान पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोण वगैरे. सहसा प्रत्येक मतदान केंद्रावरील दर दहावा मतदार किंवा मग मतदान केंद्र मोठे असेल तर मग दर विसाव्या मतदाराला असे प्रश्न विचारले जातात. मतदारांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो.

 

या संस्था एक्झिट पोल्स करतात

सी व्होटर, ॲक्सिस माय इंडिया, सीएनएक्स भारत या एक्झिट पोल्स करणाऱ्या काही प्रमुख संस्था आहेत. निवडणुकीच्यावेळी अनेक नवीन कंपन्याही येतात ज्या निवडणूक झाल्यानंतर मात्र गायब होतात. भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोल्ससाठी काही नियम आखले आहेत. निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम वा प्रभाव पडू नये, यासाठी हे नियम असतात. निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोल्ससाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो. यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं. मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत, असा नियम आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातले मतदान संपल्याच्या अर्धा तास नंतर पर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाहीत. यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ही पाहणी करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

 

एक्झिट पोलचे अंदाज बरोबर असतात का?

प्राध्यापक संजय कुमार म्हणतात, “एक्झिट पोलचे अंदाज हे देखील हवामान विभागाच्या अंदाजांसारखे असतात. काही वेळा ते अगदी अचूक असतात, काही वेळा आसपास असतात आणि काही वेळा ते बरोबर नसतात. एक्झिट पोलने दोन गोष्टींचा अंदाज बांधला जातो. मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज बांधला जातो आणि त्या आधारे पक्षांना मिळणाऱ्या जागांचा अंदाज बांधला जातो.” 2004ची निवडणूक विसरून चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पुन्हा येईल असे सगळ्या एक्झिट पोल्सनी म्हटले होते. पण एक्झिट पोल्सचे अंदाज चुकीचे ठरले आणि भाजप निवडणूक हरली.

अनेकदा वेगवेगळे एक्झिट पोल्स वेगवेगळा अंदाज व्यक्त करतात, असे का? याचे उत्तर देताना प्रा. संजय कुमार एक उदाहरण देत सांगतात, “अनेकदा एकाच आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारे तपासण्या करतात. एक्झिट पोलबाबतही हे होऊ शकते. वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे सँपल घेतले (चाचणी गट निवडला) किंवा वेगळ्या प्रकारे फील्डवर्क केल्याने असे होऊ शकते. काही एजन्सीज फोनवरून डेटा गोळा करतात तर काही एजन्सीज त्यांच्या कर्मचाऱ्यांना फील्डवर पाठवतात. यामुळे निकाल वेगवेगळे असू शकतात.

 

पहिल्यांदा कधी झाला पोल्स होता?

1957च्या दुसऱ्या सार्वजनिक निवडणुकांदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने भारतात पहिल्यांदा निवडणूक चाचणी केली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे प्रमुख एरिक डी कॉस्टा यांनी निवडणूक सर्वेक्षण केले होते, पण याला पूर्णपणे एक्झिट पोल म्हणता येणार नाही. त्यानंतर 1980मध्ये डॉक्टर प्रणय रॉय यांनी पहिल्यांदा एक्झिट पोल केला. त्यांनीच पुन्हा 1984मध्ये एक्झिट पोल केला होता. दूरदर्शनने 1996मध्ये एक्झिट पोल केला. पत्रकार नलिनी सिंह यांनी हे सर्वेक्षण केले होते, पण यासाठीची आकडेवारी गोळा करण्यासाठी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीजने फील्ड वर्क केले होते. त्यानंतर एक्झिट पोल्सचे हे सत्र सुरूच आहे. फक्त त्याकाळी एखाद-दोन एक्झिट पोल असत, आता डझनभर एक्झिट पोल्स होतात.

 

इतर देशांत एक्झिट पोल्स होतात का?

भारताच्या आधीपासून अनेक देशांमध्ये एक्झिट पोल्स होत आले आहेत. अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियासह जगभरातल्या अनेक देशांत एक्झिट पोल होतात. अमेरिकेत 1936मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक्झिट पोल करण्यात आला. जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्क शहरात एक निवडणूक पाहणी केली. राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोणत्या मतदाराला मत दिले हे यामध्ये मतदान करून बाहेर येणाऱ्या व्यक्तींना विचारण्यात आले. फ्रँकलिन रुझवेल्ट ही निवडणूक जिंकतील, असा अंदाज या आकडेवारीवरून व्यक्त करण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.