घरकूल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादांना जामीन मंजूर

0

लोकशाही ऑनलाईन डेस्क : जळगाव : वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना  मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी नंतर जामीन मंजूर करण्यात आला. सुरेशदादा यांच्या निकटवर्तीयांनी जामिनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोणत्या अटी, शर्तिंवर जामीन मंजूर झाला या बाबी सायंकाळी पर्यंत जामिनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर समजेल असेही सूत्रांनी सांगितले.

राज्यातील बहुचर्चित घरकुल प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री, आमदार, नगरसेवक यांना ऑगस्ट २०१८ महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रमुख संशयित सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता.

माजी सुरेशदादा जैन यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले तरीही त्यांना जामीन मिळालेला नव्हता. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून कायदेशीर अडचणीत आलेल्या शिवसेना नेते सुरेश दादा जैन यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे, यापूर्वी मुंबईच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती वैद्यकीय कारणावरून त्यांना जामीन झाला होता मात्र मुंबई हायकोर्ट च्या वतीने त्यांना आता नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.तत्कालीन विशेष सरकारी विधी तज्ञ असलेले प्रवीण चव्हाण यांचे गिरीश महाजन यांच्या विरोधातील पेन ड्राईव्ह प्रकरणात नाव आल्याने व त्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्याकडून घरकुल घोटाळे सह अन्य न्यायालयीन कामकाज प्रकरणे काढून घेण्यात आले होते. त्यांनीच केलेल्या आतापर्यंतच्या कामकाजामुळे सुरेशदादा जैन यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा देखील झाली होती.
वैद्यकीय कारणावरून सुरेशदादा जैन यांना यापूर्वी तात्पुरता स्वरूपाचा जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र आता नियमित जामीन झाल्याने सुरेशदादा जैन यांना जळगाव येथे त्याच्या निवासस्थानी देखील येता येणार आहे.

गेल्या 35 वर्ष सातत्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर सुरेश दादा जैन यांचा प्रभाव होता, मंत्रिपदासह सहकार क्षेत्रामध्ये अनेक पदे त्यांनी भूषवली, यामुळे त्यांना जिल्हाभरात राजकीय प्रभाव निर्माण करता आला, मात्र घरकुल घोटाळ्यात झालेल्या कायदेशीर अडचणीमुळे त्यांना राजकारणात अधिक सक्रिय राहता आलेले नाही, या पश्चात त्यांना कारागृहात देखील राहावे लागले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून राजकारणात सक्रिय नसलेल्या सुरेश दादा जैन यांच्या जामीनाने जिल्ह्याच्या राजकारणावर नेमके काय पडसाद उमटतात ? हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे घरकुल घोटाळा ?
घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली.मात्र २००१ मध्ये या योजनेतला घोळ समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवहार हे सगळे प्रकार उघडकीस आले. पालिकेने ज्या जागेवर घरकुलं बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. या योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या बिल्डर्सना हे काम दिले. ठेकेदारांना २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले होते. ठेकेदाराला विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. निविदेमधील काम वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा ठेकेदाराने पाळली नाही. तरीही कामाला पाच वर्षांपेक्षा जास्त विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.