नाथाभाऊ गिरीशभाऊ यांच्यात दिलजमाई होईल का..!

0

लोकशाही संपादकीय लेख

लोकसभेची निवडणूक पार पडली. भाजपला देशात अपेक्षित यश मिळाले नाही. ४०० पारचा नारा देण्यात  येणाऱ्या भाजपला पूर्ण बहुमतही मिळाले नाही. त्यासाठी एनडीएच्या मित्र पक्षाची मदत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार अस्तित्वात आले. महाराष्ट्रात भाजपला तसेच महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. ४५ प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीला ४८ पैकी अवघ्या १७ जागांवरच निवडून येता आले. त्यातच एकूण २८ जागा लढविणाऱ्या भाजपच्या फक्त ९ जागाच निवडून आल्या. महायुतीचा दारुण पराभव झाला. जळगाव जिल्हा मात्र भाजपचा गड कायम राखण्यात यशस्वी ठरला. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही जागा भाजपने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. जळगावमधून स्मिता वाघ पहिल्यांदा तर रावेर मधून खासदार रक्षा खडसे तिसऱ्यांदा विजयी झाल्या. जळगाव जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा झाली. त्या उलट सुलट चर्चांबाबत स्थानिक भाजप नेत्यांवर खापरही फोडले गेले. तथापि वरिष्ठांच्या आदेशानंतर जिल्ह्यात महायुतीने एकत्रितपणे निवडणूक प्रचारात काम केल्याने दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.

रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर त्या निवडून आल्या. त्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातच वर्णी लागणार असेच सर्वांचेच मत होते, आणि नेमके तसेच झाले. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि माजी मंत्री रक्षा खडेसेंचे सासरे एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून पुन्हा भाजप मध्ये प्रवेश करून घर वापसी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांनी घरवापसीचा निर्णय घेतला असल्याचे नाथाभाऊंनी सांगितले असले, तरी महाराष्ट्रातील भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सहर्ष स्वागत करण्याऐवजी दिल्लीत नाथाभाऊंच्या प्रवेशाचा निर्णय झाला असला, तरी महाराष्ट्रातील भाजपला अद्याप कळविण्यात आले नाही, असे उपरोधक बोलून जणू टीकाच केली.

काँग्रेस तसेच इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांचे स्वागत करणारे महाराष्ट्रातील भाजप नेते मात्र नाथाभाऊंच्या घरवापसी बाबत विशेष उत्सुक नव्हते. तसेच निवडणूक काळात नाथाभाऊंना भाजप प्रवेश दिला गेला तर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी वाढेल, असा वरिष्ठांना संदेश दिल्यामुळे नाथाभाऊ खडसे यांचा तेव्हापासून ते अद्यापपर्यंत पक्षप्रवेश रखडला आहे. तथापि लोकसभा निवडणूक काळात नाथाभाऊंनी रक्षाताईंचा एकट्याने प्रचार केला. याचा फायदाही झाल्याचे खुद्द रक्षा खडसे यांनी कबूल केले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री पदावर दावा केला. त्याच्या ऐवजी देवेंद्र  फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आणि आपल्या वाटेला येणारा नाथाभाऊंचा काटा काढण्यासाठी जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना हाताशी धरून नाथाभाऊंना पक्षातून डावलले गेले. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले. मुलगी रोहिणी खडसेला तिकीट देऊन त्यांना पाडण्यात आले आणि त्यानंतर नाथाभाऊंच्या मागे विविध प्रकारे ससेमिरा लावला गेला. भाजपच्या महाराष्ट्र संघटना बांधणीत ज्यांनी मोठा वाटा उचलला त्यांना पक्षात मानहानीकारक वागणूक दिली गेली. त्यामुळे नाथाभाऊंनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांना आमदारकीही मिळाली. परंतु जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि नाथाभाऊ यांचे राजकारणात विळा भोपळ्याचे नाते निर्माण झाले.

जिल्हा बँक दूध संघ तसेच इतर संस्थांमधून नाथाभाऊंची सत्ता गेली. दरम्यान रोज गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले. हे सर्व होत असताना रक्षा खडसे मात्र भाजपशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ रक्षा खडसे यांना मंत्रीपदाच्या रूपाने मिळाले. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शनिवारी मतदार संघात त्या परतल्या, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत झाले. ‘जिल्ह्यात भाजप आणखी मजबूत करायची असेल तर इतर पक्षातील नेत्यांना भाजपात घेतले जाईल. तसेच एकनाथराव खडसे हे भाजपचे जुने जेष्ठ नेते आहेत. त्यांना पक्षात घेतले जाईल. हा त्यांचा प्रवेश यथावकाश होईल, परंतु त्यांचे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील दुरावा दूर करून त्यांच्यात दिलजमाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे’ महत्त्वाचे वक्तव्य त्यांनी केले. ‘नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांच्यातील दिलजमाईला यश येईल का?’ असे अनेकांना वाटतेय. तथापि राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो. त्यामुळे मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाला यश येवो आणि जिल्ह्याच्या विकासात त्यांचा हातभार लागो, याच या निमित्ताने शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.