विकासकामांसाठी चढाओढ का होत नाही ?

0

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना जनतेच्या विकासाच्या कामांऐवजी आरोप – प्रत्यारोप करण्याचा रोग लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर भाजपतर्फे तसेच त्यांच्या युवासेनेतर्फे नाना पटोले यांच्याविरूध्द रान उठवले जात आहे. नाना पटोलेवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. जळगावातही भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

जिल्हाभरात भाजपतर्फे नाना पटोले यांचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात भाजपतर्फे निषेध करण्यात येत आहे. आपल्या सर्वोच्च नेत्याविषयी कुणी चुकीचे विधान करीत असेल तर त्याचा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना राग येणे, चिड निर्माण होणे साहजिक आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुध्दा अशाप्रकारची वक्तव्ये करून काय साध्य करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते कोणा एका पक्षाचे नाहीत त्यांचा आदर प्रत्येकांनी केलाच पाहिजे. परंतु अलिकडे पक्षांना आपल्या विकास कामांच्याबाबत बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे मन विचलित करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करून आपल्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्याचे काम केले जाते. हे काँग्रेसच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षाकडून होते आहे. हे दुर्दैवच म्हणता येईल.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार उन्मेश पाटील यांचेत असेच आरोप – प्रत्यारोप होत आहेत. खा. उन्मेश पाटील यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच गिरणा नदीच्या संवर्धनासाठी हाती घेतलेली गिरणा परिक्रमा हा स्तुत्य उपक्रम म्हणता येईल. तथापि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरूध्द विशेषत: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विरोधात पोरकट विधाने करून आपली स्वत:ची तसेच गिरणा परिक्रमा या उपक्रमाची प्रतिष्ठा घालवून बसताहेत. गिरणा परिक्रमा हे राजकीय पक्षाचे व्यासपीठ नाही असे आवर्जुन सांगणारे खा. उन्मेश पाटील यांना आपण काय बोलतोय याचे भान राहत नाही.

गिरणा पुलावरून दररोज जाणारे – येणारे पालकमंत्री गुलाबराव पाटलांना गिरणा नदी पात्रातून होणारी अवैध वाळू उपसा दिसत नाही का? असा सवाल करून वाळू माफियांशी त्यांची हात मिळवणी असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आणि मग गुलाबराव पाटलांनी खासदार उन्मेश पाटांनी साधी एखादी मुतारी आपल्या मतदारसंघात बांधलेली नाही असा आरोप केला आणि आरोप – प्रत्यारोप सुरू झाले. 300 किलोमीटरच्या गिरणा काठावरच्या परिक्रमेला त्यामुळे दुय्यम स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे एखादी चांगली योजना अथवा प्रकल्प पूर्ण करावयाचा असेल तर बोलघेवडेपणा कमी करायला हवे.

गिरणा परिक्रमा ही राजकीय नाही असे खा. उन्मेश पाटील म्हणत असले तरी गिरणा परिक्रमा ही भाजपचीच असल्याचे लेबल त्याला लागले आहे. त्यामुळे गिरणा काठावरील गावांमध्ये तिथल्या ग्रामस्थांची चर्चा करतांना सर्व ग्रामस्थ भाजपच्याच विचाराचे असतील कशावरून? त्यातच या परिक्रमेत ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर सारख्या कार्यकर्त्यांच्या राजकीय भाषणाने आगीत तेल ओतल्यागत झाले. एकेकाळी शिवसेनेत असलेले जळकेकर महाराज गुलाबरावांचे समर्थक होते. त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजप प्रवेश केला आणि गुलाबराव पाटलांचे माजलेले रक्त काढू अशी भाषा करणे गिरणा परिक्रमाला गालबोट लावणारे आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेतील संबंधाबाबत गिरणा परिक्रमाच्या कार्यक्रमात बोलण्याने काय साध्य होणार आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्या पक्षाची गरिमा पाळली पाहिजे. नारायण राणेंच्या धमकीमुळे चालत्या रेल्वेतून गुलाबराव पाटलांनी उडी ठोकून पळून गेले. या शिळ्या कडीला ऊत आणून ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकरांनी स्वत:ची शेखी मिरवून घेतली. व्यासपीठ कोणते, कार्यक्रम कोणता, त्या व्यासपीठावरून काय बोलले पाहिजे याचे भान हभप जळकेकरांना असायला हवे होते. परंतु दुर्दैव म्हणावे लागेल. अशा वक्त्यांसाठी स्वतंत्र राजकीय जाहीर सभा आयोजित करून ते बोलण्याची मुभा द्यावी.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या घरासमोर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ बचावची भूमिका घेऊन निषेधाची रांगोळी काढली. त्याचा परिणाम भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांच्या घरासमोर मध्यरात्री अज्ञातांनी काळी रांगोळी काढून पलायन केले. खासदारांविषयी सुध्दा आक्षेपार्ह मजकूर काढला. हे प्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन अशा फालतू प्रकारात आपली शक्ती खर्च करण्याऐवजी विधायक रचनात्मक कामासाठी करावा हे ठरवून घेतले पाहिजे. तसे केले तर अनावश्‍यक आपसात तेढ निर्माण होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.