Diwali 2021 : आज वसुबारस… जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून प्रशासनाकडूनही अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या अनुषंगाने  कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदानं पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे.

सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. अशातच आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. आज गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.

आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

वसुबारस व्रत :

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारस पूजा विधी 

कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीच्या दिवशी सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात. ही पूजा प्रामुख्याने संध्याकाळी गोरज मुहूर्तावर केली जाते. या वेळेला सूर्य पूर्णपणे मावळलेला नसतो. पूजेपूर्वी गाय आणि वासरांना सजवून त्यांना सजावट केलेले कपडे घातले जाते आणि विविध फुलांचा हार घालण्यात येतो. त्यांच्या  कपाळावर कुंकू किंवा हळदीचा तिलक लावला जातो. काही ठिकाणी गाय आणि वासरू यांच्या मूर्तींची पूजा केली जाते. गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूगचा नैवद्य अर्पण केला जातो. भारतातील अनेक गावांमध्ये गाय उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी उपवास करतात.

वसुबारसचे महत्त्व

वसुबारसचे माहात्म्य भविष्य पुराणात सांगितलेले आहे. याला बछ बारसचे पर्व असेही म्हटले जाते. हे पर्व नंदिनी व्रत म्हणूनही साजरे जाते जाते. कारण नंदिनी आणि नंदी (बैल) हे दोन्ही शैव धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. हा सण मुळात मानवांनी गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची संयुक्त पूजा केली जाते. पूजेदरम्यान त्यांना गव्हापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जातात.

वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीतही केला जातो. पण तंस पाहायला गेलं तर, तो सण वेगळा असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते, हा दिवाळीचा पहिला दिवा असतो, असं मानलं जातं. यंदा सोमवार, म्हणजेच, 01 नोव्हेंबर 2021 रोजी निज अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.