धरणगावात बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी प्रचंड निषेध मोर्चा

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथे ६२ वयाच्या वृद्धाने आठ व सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. संपूर्ण शहर या घटनेने हादरले आणि गावात एकच खळबळ उडाली. शहराचा प्रतिमेला हा डाग आहे. म्हणुन अशा घटनांना वेळीच आळा बसला पाहिजे, यासाठी शहरातील सुजाण नागरिकांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी व गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा मिळण्यासाठी प्रशासनावर दबाव यावा यासाठी आज भव्य मूक मोर्चाचे आयोजन झाले.

या मोर्चाला सकाळी आठ वाजेपासून बालाजी मंदिर येथून सुरुवात झाली. या मोर्च्यात १० हजार नागरिक, बंधू-भगिनिंचा सामावेश होता. विशेष करुन मुली, महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. मुस्लिम महीला पुरुषांचा सहभाग उत्स्फूर्त होता. या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ  झाला. महाराजांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. कविता महाजन, प्रा. ज्योती जाधव, नाजनिन शेख, उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन उपस्थित होत्या.  झालेल्या घटनेची चीड प्रत्येकाचा मनामध्ये होती. लहान मुलगी प्रांजल सुनिल चौधरी व वरील सर्व अतिथिंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा घटना यापुढे घडू नयेत, असे राक्षस समाजात वाढू नयेत, यासाठी या राक्षसाला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली. त्याचप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, प्रसिद्ध विधीतज्ञ उज्वल निकम यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

सूत्रसंचालन प्रा. नेत्रा पवार यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सुनिल चौधरी यांनी केली. पोलिस प्रशासन व महसूल यंत्रणेने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार आर. डी. महाजन यांनी मानले. मोर्चा यशस्वी होण्यासाठी शहारातील सर्व समाज, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य लाभले. शहरातील सर्व समाज, संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आवर्जून या मोर्चास उपस्थित होते. नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते व पोनि शंकर शेळके यांना उपस्थीत लहान मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. शहरातली सुजाण नागरिकांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन होते.

या मोर्चात कराटे क्लासच्या मुली त्यांच्या गणवेशात मोर्चाचा अग्रभागीच होत्या. बालाजी मंदिरापासून निघालेल्या मोर्चाचे एक टोक कोड बाजारावर तर दुसरे टोक बालाजी मंदिराजवळ होते. निषेधाचे घोषवाक्ये लिहिलेली फलक मुलींचा हातात होते. संपूर्ण शहरात गंभीर शांततेचे वातावरण तयार झाले होते. निषेध करण्यासाठी मूक मोर्चा असल्यामुळे कोणतीही घोषणा न देता शांततेने शिवाजी महाराज स्मारका जवळ आला. समारोप प्रसंगी महिलांच्या भावना व्यक्त करत असताना बऱ्याच महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या त्या धारा होत्या. पोनि शंकर शेळके यांनी पीडित मुलींमध्ये मी माझ्या मुलींना पाहत होतो. म्हणून गुन्ह्याचा तपास लवकर करून चार्जशीट दाखल करू, असा शब्द दिला. त्याचप्रमाणे पीडित मुलींना शासनाच्या वतीने मदत करू असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.