नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली मद्य विक्री धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडी कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टाच्या पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) कावेरी बावेजा यांनी हे निर्देश दिले आहेत.
मद्य विक्री धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची २८ मार्चला चार दिवसांची ईडी कोठडी वाढवली होती. केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना ईडीने २२ मार्चला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना सहा दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवलं होतं.
अरविंद केजरीवाल यांच्यावरील सुनावणीवेळी आज न्यायालयाने ‘ईडी’ला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यावेळी ईडीने केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.