पैशासाठी घरात घुसून महिलेचा विनयभंग; दोघांना अटक

0

लोकशाही न्युज नेटवर्क

बारामती : पैशासाठी घरात घुसून महिलेचा विनयभंग.व्याजाच्या पैशावरून सावकारांकडून दिल्या जात असलेल्या त्रासाला कंटाळून येथील एकावर घर सोडून परागंदा होण्याची वेळ आली. सावकारांनी त्याची पत्नी घरात असताना तेथे जात शिविगाळ, दमदाटी करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सीताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी (रा. बारामती) व अळनुरे (पूर्ण नाव नाही, रा. परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. यातील बोरकर व थोरात यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली. भिगवण रस्त्यावर राहणाऱ्या एका महिलेने याबाबत फिर्याद दिली.

या महिलेच्या पतीने 2021 मध्ये वाशिम जिल्ह्यात बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू केली होती. कंपनी सुरू करताना तिच्या पतीने या पाचजणांकडून महिना पाच टक्के व्याजाने एक कोटी नऊ लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्यातील बरीचशी रक्कम व्याजासह कंपनी सुरु असताना दिली जात होती. परंतु दुर्दैवाने त्यांच्या कारखान्याला ३ मे २०२१ रोजी आग लागली. त्यात कंपनीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सावकारांची बाकीची रक्कम देण्यास त्यांना अडचण आली.

त्यानंतर या सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली. कंपनीच्या विम्याची रक्कम मिळाल्यावर पैसे देतो असे फिर्यादीच्या पतीने त्यांना सांगितले. परंतु तरीही त्रास सुरुच राहिला. या त्रासामुळे १७ एप्रिल रोजी या महिलेचा पती घरातून निघून गेला. ते निघून गेल्याचे माहिती असतानाही पोपट थोरात याने महिलेच्या घरात प्रवेश करत तिला व्याजाच्या पैशासाठी शिविगाळ करत तिचा विनयभंग केला. व्याजासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात विनयभंगासह सावकारीचा गुन्हा दाखल केला. बोरकर व थोरात यांना अटक करण्यात आली. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, उपनिरीक्षक घोडके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.