महापालिकेच्या कर्मचाऱ्याने साडेनऊ लाखात गंडवले;आजीवर आली भीक मागायची वेळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुणे : आजीवर आली भीक मागायची वेळ . ७० वर्षांच्या वृद्ध महिलेने तिच्या नातीवर उपचारासाठी १० टक्के व्याजदराने घेतलेल्या ४० हजार रुपयाच्या बदल्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याने साडेनऊ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

खडक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिलीप विजय वाघमारे (वय ५२, रा. गंज पेठ) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिलीप वाघमारे हा पुणे महानगरपालिकेच्या झाडू खात्यात नोकरीला आहे. ज्येष्ठ महिलेला मिळणाऱ्या निवृत्ती वेतनामधून आरोपीने हे पैसे उकळले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षांच्या महिलेने पाच वर्षांपूर्वी नातीच्या उपचाराकरिता वाघमारे याच्याकडून १० टक्के व्याजदराने ४० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात महिलेने कर्ज काढून आरोपीस मुद्दल ४० हजार आणि व्याजापोटी १ लाख रुपये दिले होते. मात्र वाघमारे याने महिलेचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन आणखी व्याज आहे, असे महिलेला सांगितल.

ते व्याज वसूल करण्यासाठी महिलेचे दोन एटीएम कार्ड व पासबुक वाघमारे याने काढून घेतले. त्या एटीएमवर दरमहा जमा होणारे १६ हजार ३४४ रुपये वाघमारे काढून घेत. तर महिलेला दरमहा १ ते २ हजार रुपये देत असे. गेल्या पाच वर्षांपासून हे सुरू होते. त्याने लाख रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले आहे. एवढ्यावरच न थांबता आणखी देणे असल्याचे सांगून वाघमारे याने एटीएम कार्ड व पासबुक देण्यास नकार दिला होता.

महिलेवर भीक मागण्याची वेळ

वाघमारे पुरेसे पैसे देत नसल्याने महिलेवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे ती सारसबाग गणपतीसमोर फूटपाथवर भीक मागून जगत होती. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या एका भाविकाने तिच्याकडे विचारपूस केली असता महिलेने सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर या नागरिकाने खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना भेटून महिलेची व्यथा सांगितली. वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल केला.

वाघमारेकडे पेन्शनधारकांचे ८ एटीएम कार्ड व ५ पासबुक

वाघमारे याच्या घरची झडती घेतली असता, त्याकडे निवृत्तिवेतन मिळत असलेल्यांचे ८ एटीएम कार्ड व ५ पासबुक मिळून आले आहेत. वाघमारे याने आणखी कोणाला त्रास देऊन बेकायदेशीरपणे व्याजाची रक्कम वसुल केली असल्यास त्याबाबत खडक पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.