बनावट देशी दारू कारखान्यावर छापा : ११ लाखांचा ऐवज जप्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

धरणगाव; बनावट देशी दारू कारखान्यावर छापा. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट देशी दारूची निर्मिती करणार्‍या कारखान्यावर छापा मारून ११ लाख रूपयांचा ऐवज जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाला धरणगाव येथे बनावट मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार जिल्हा अधिक्षीका सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच. पाटील यांनी पथकाची नियुक्ती केली. या पथकात दुय्यम निरिक्षक ए. एस. पाटील, व एस. एफ. ठेंगडे यांच्यासह एन. व्ही. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे, राहुल सोनवणे यांच्या समावेश होता.

या पथकाने भास्कर पांडुरंग मराठे याचे राहते घर, साई गजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव येथे छापा टाकला. यात या ठिकाणी बनावट देशी मदय तयार करण्याकरीता लागणारे साहीत्य स्पीरीट, बनावट देशी दारु टँगो पंचच्या १८० मिली च्या सिलबंद बाटल्याचे ११७ बॉक्स(५६१६ बाटल्या), बनावट देशी दारु टँगो पंचच्या ९० मिली च्या सिलबंद वाटल्यांचे ८६ बॉक्स (८६०० बाटल्या), देशी दारूचा तयार ब्लेंड, ४ सिलींग मशिन, १ ब्लेंडिंग मशिन, बुचे, रिकाम्या बाटल्या, खोके, कागदी लेबल तसेच दोन दुचाकी असा एकुण रु. ११ लाख २ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर चौकशीसाठी गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि, भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क,धरणगाव; भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव; कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, , रा. मराठे गल्ली, धरणगाव; आणि भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या सर्वांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, संचालक श्रीमती उषा वर्मा; अर्जुन ओहोळ विभागीय उपआयुक्त नाशिक विभाग आणि जिल्हा अधिक्षक श्रीमती सिमा झावरे, यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच. पाटील; दुय्यम निरिक्षक ए. एस. पाटील, व एस. एफ. ठेंगडे यांच्यासह एन. व्ही. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे व राहुल सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. तर या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.