महत्वाची बातमी : CET च्‍या वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे येत्‍या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षांच्‍या वेळापत्रकात दोन दिवसांपूर्वी बदल करण्यात आले होते. मात्र, सुधारित वेळापत्रकातील एमएचटी-सीईटी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची “नीट’ या परीक्षा एकाच दिवशी आल्याने आता पुन्हा वेळापत्रकात राज्‍य सीईटी सेलला बदल करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार,  राज्‍य सीईटी सेलने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्‍या सुधारित वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटी परीक्षेत ५ मे रोजी पीसीएम गटाची परीक्षा होणार होती. मात्र राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार याच दिवशी नीट यूजी (वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रम) परीक्षा होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नीट परीक्षा ५ मे रोजी होणार असल्याने ५ मे रोजी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा घेतली जाणार नाही. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे राज्‍य सीईटी सेलकडून स्‍पष्ट करण्यात आले आहे. सविस्‍तर माहिती राज्‍य सीईटी सेलच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.