शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; १ लाखाचा मका जळून खाक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महावितरणच्या वीजतारांचा शॉटसर्किट झाल्याने तालुक्यातील कुऱ्हाडदे शिवारामधील शेतात आग लागल्याने मका जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

सागर दादाजी नरोटे (वय २८) यांचे कुऱ्हाडदे शिवारात ३ एकर शेती आहे. या शेतात त्यांनी मक्याचे पीक घेतले आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतावरुन गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉर्टसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागली. नेहमीप्रमाणे सकाळी शेतकरी सागर नरोटे हे शेतात येत असताना त्यांना मक्‍याला आग लागल्याचे दिसून आले.

यावेळी त्यांनी शेतातील इतर कामगारांची सोबत पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर आग विझवली. या आगीत शेतातील एक एकरातील ४० क्विंटल एवढा १ लाख रुपये किंमतीचा मका खाक झाला. याबाबत शेतकरी सागर दादाजी नरोटे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत. दरम्यान पोलीस कर्मचारी अथवा शेतकरी उपस्थित नसताना महावितरण विभागाने परस्पर पंचनामा केल्याची तक्रार देखील शेतकरी सागर नरोटे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.