“पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येऊ शकतो”- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताच्या स्वातंत्र्यापासून काश्मीरचा मुद्दा हा नेहमीच वादाचा राहिलेला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून कायम तणाव राहिलेला आहे. त्यात पाकव्याप्त काश्मीरचा भाग अजूनही भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दावे केले जातात.

या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच, आता आपण कांदे, बटाटे, तूरडाळ यातून बाहेर पडलं पाहिजे, असं देखील कपिल पाटील म्हणाले आहे.

कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टातर्फे स्वर्गीय राम कापसे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेमध्ये बोलताना कपिल पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी विधान केलं. त्यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंहराव पंतप्रधान असताना संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पारीत केलेल्या कायद्याचा उल्लेख केल्याचा संदर्भ देखील त्यांनी यावेळी दिला.

कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर मुद्द्यावर राज्यसभेत उत्तर देताना दिलेल्या संदर्भाचा उल्लेख केला. “मला आठवतंय की राज्यसभेत मोदींनी उत्तर दिलं होतं तेव्हा मोदींनी नरसिंहराव पंतप्रधान असतानाचा उल्लेख केला आहे. त्यावेळी नरसिंहराव यांनी संसदेचं संयुक्त अधिवेशन घेतलं होतं. तेव्हा त्यांनी कायदा पारित करून घेतला होता. त्यात शब्द असे होते की काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर कधी ना कधी भारतानं घ्यायला हवा, तरच ही समस्या सुटेल. तेव्हा मोदींनी सांगितलं होतं की हे तुमचंच काम आहे. तुम्ही नाही केलं म्हणून आम्ही करत आहोत”, असा संदर्भ यावेळी कपिल पाटील यांनी दिला.

दरम्यान, यावेळी बोलताना पाटील यांनी जनतेला कांदे, बटाटे, तूरडाळ या सगळ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. “आता आपण वाट बघुयात. कदाचित २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त मोदी करू शकतात. म्हणून कांदे, बटाटे, तूरडाळ यातून आपण बाहेर आलं पाहिजे. देशच नसेल तर कांदे-बटाटे खरेदी करणार कुठून आपण?” असा सवाल देखील कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.