जनावरांच्या चरबीपासून तूप, पोलिसांकडून कारखाना उद्ध्वस्त

0

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अन्नात, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करून सर्रास विक्री केली जाते हे तर आपल्याला माहित असेलच मात्र भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.   भिवंडीतील खडीकिनारी चक्क जनावरांपासून तूप बनवले जात होते. या बोगस तुपाच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला असून तो उध्वस्त  केला.

नागरिकांना पत्ता नव्हता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या शहरातील खडीलगाच्या ठिकाणी इदगाह सालटर हाऊस येथे बोगस तुपाचा कारखाना सुरू होता.  या ठिकाणी म्हशी आणि रेड्यांची कत्तल करून त्यांच्या अवशेषांपासून तूप बनवले जात होते आणि हेच तूप अनेक खानावळमध्ये विकलेही जायचे. स्वस्त तूप मिळत असल्याने याची विक्री भरपूर वाढली होती. नागरिकांना याचा जरा देखील पत्ता नव्हता काही नागरिकांनी पालिका आयुक्त यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.

घटनास्थळी छापा

पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहायक आयुक्त सुदाम जाधव यांनी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा टाकत तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे आणि तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. हे भेसळयुक्त तूप अनेक खानावळ, छोटी हॉटेल यांना विकण्यात येत होते. याप्रकरणी अनेक तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत आयुक्त अजय वैद्य यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

तूप कढवण्याच्या भट्ट्या सुरू

त्यानंतर पालिका पर्यावरण विभागाचे सहायक आयुक्त सुदाम जाधव, आपत्कालीन विभागप्रमुख साकिब खर्बे, कर मूल्यांकन विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक सायरा बानो यांनी पालिका पथकासह घटनास्थळी कारवाई केली. या वेळी येथे तूप कढवण्याच्या भट्ट्या सुरू असल्याचे आढळून आले. या वेळी पालिका पथकाने बनावट तुपाचे १५ किलो वजनाचे २० डबे, कढई असे मोठे साहित्य जप्त केले आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुदाम जाधव यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.