नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी आहे. सरकार आता सर्वसामान्यांना भारत ब्रँड अंतर्गत गव्हाचे पीठ (आटा), डाळी नंतर तांदूळ सवलतीच्या दरात पुरवणार आहे. हा तांदूळ २५ रुपये किलो दराने विकला जाणार आहे. तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे.
हा तांदूळ नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन आणि केंद्रीय भंडार आउटलेट आणि मोबाईल व्हॅनद्वारे विकला जाणार आहे. सरकार आधीपासून गव्हाचे पीठ आणि डाळीचा या ब्रँडखाली पुरवठा करत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत जीवनाश्यक खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार २५ रुपये सवलतीच्या दराने ‘भारत राइस’ सादर करण्याचा विचार करत आहे.
सध्या केंद्र सरकार भारत गव्हाचे पीठ आणि चणा डाळ अनुक्रमे प्रति किलो २७.५० रुपये आणि ६० रुपये या सवलतीच्या दराने पुरवते. ही उत्पादने सुमारे २ हजार किरकोळ केंद्रावर वितरीत केली जातात. भारत तांदूळ विक्रीची प्रक्रिया भारत डाळ आणि गव्हाच्या पीठाप्रमाणेच असण्याची शक्यता आहे.