संगम बेटावर पोलिसांची धाड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भंडारा :संगम बेटावर पोलिसांची धाड . वैनगंगा नदीपात्रातील संगम बेटावर सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाड टाकली. सहसा कुणीही पोहोचणार नाही, अशा ठिकाणी पोलिसांनी पोहोचून ३ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र श्रावण मेश्राम (५२), देवराम कृष्णाजी बोरसरे (३७), संजय बाबुराव खंगार (३७) तिघे राहणार तिड्डी, राकेश बाबुलाल मेश्राम (३०) रा.संगम पुनर्वसन अशी दारू गाळणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगम बेटावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने तेथे पोहोचून धाड मारली. त्यावेळी हातभट्टीची दारू गाळणे सुरू होते. तीन चुलींवर लोखंडी ड्रम मांडून दारू गाळली जात होती. यावेळी २,७४० किलो मोहपास, ९० मातीचे मटके, ३० प्लास्टीक ड्रम, तीन घमेले, २,००० किलो जळाऊ लाकडे, दारूने भरलेले रबरी ट्युब आदी साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, विवेक राऊत, सहायक फौजदार धर्मेंद्र बोरकर, सुधीर मडामे, हवालदार कैलाश पटोले, किशोर मेश्राम, नितीन महाजन, गौतम राऊत, श्रीकांत मस्के, प्रफुल्ल कठाणे, स्नेहल गजभिये, नंदकिशोर मारबते, सचिन देशमुख, मंगेश मालोदे यांनी केली.

– वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या बेटावर पोहोचणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेत, येथे दारू गाळली जात होती. पोलिसांनी येथील रनिंग हातभट्टीवर धाड मारण्यासाठी खासगी बोटी घेतल्या. लाइफ जॅकेट घालून पोलीस बेटावर पोहोचले. त्या ठिकाणी असलेल्या झुडुपी वनस्पतीच्या आधारे दारू गाळली जात होती. या धाडीमुळे दारू गाळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.