भगवद्‌गीता : अफाट ज्ञानभांडारातून अत्युच्च समाधान देणारा प्रवाह

0

 लोकशाही विशेष लेख

 

भगवद्‌गीता हा अतिप्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक उत्कृष्ट ग्रंथ म्हणूनही भगवद्‌गीतेचा उल्लेख होतो. गीता ही ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. भगवद्‌गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे, जो विश्वातील सर्व समस्यांवर एक प्रभावी औषध, मदत, उपाययोजना म्हणून सिद्ध असल्याचे वेळोवेळी अनुभवास येते. भगवद्‌गीतेत एकूण १८ अध्याय आहेत या एकूण अध्यायांमध्ये ७०० श्लोक आहेत. या श्लोकांनी समृद्ध अशी ही भगवद्‌गीता (Bhagavad Gita) मानवी जीवनाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य ठेऊन आहे. यामुळेच भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळेच न्यायालयात देखील गीतेवरच हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे.

गीताई हे आचार्य विनोबा भावे (Vinoba Bhave) यांनी केलेले गीतेचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर आहे. भगवत्‌ गीता हा भारतवर्षातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय प्रभावी अश्या तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला असून ‘महाभारत’ या महाकाव्याचा एक भाग असलेला आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी गीता ही अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण (Lord Krishna) हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.

युद्धाच्या सुरुवातीला कुरुक्षेत्रावर रणांगणामधे सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला मुख्य संवाद. यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या विविध शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. भगवद्‌गीता ही फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आणि प्रचलित आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.

भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान झाल्याशिवाय राहत नाही.

राहुल पवार
उपसंपादक लोकशाही

Leave A Reply

Your email address will not be published.