भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांच्या आदेशानुसार भडगाव येथील पंकज दिपक मोरे, वय-24, रा.यशवंत नगर, भडगाव ता.भडगाव याला दि.27.02.2023 पासून एक वर्ष मुदतीकरीता जळगाव, धुळे व नाशिक या जिल्ह्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आलेले आहे. सदर इसम हा सन 2020 पासून बेकायदेशीर कृत्यात, बेकायदेशीर वाळू चोरीच्या गुन्हेगारीत सामील आहे. दि.31.10.2021 रोजी विजय भानुदास येवले, मंडळ अधिकारी व त्यांचे सहकारी हे भडगाव पाचोरा रोडवर शासकीय आय.टी.आय. जवळ अवैध गौणखनिज कारवाई कामी हजर असतांना त्यांना विना नंबरचे ट्रॉली व व ट्रॅक्टर वाळू चोरी करतांना आढळल्याने सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीवर कारवाई करीत असतांना सदर हद्दपार इसम पंकज दिपक मोरे याने विजय येवले, मंडळ अधिकारी यांना धक्का बुक्की करून व त्यांच्या सोबत असलेले योगेश ब्राह्मणे (तलाठी), एन. जी. बागड (मंडळ अधिकारी) यांना दमदाटी करून ट्रॅक्टर मधील गौण खनिज (वाळू) खाली करून ट्रॉली सह सदर ठिकाणाहून पळून जाऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा सदर इसमाविरूद्ध दाखल आहे. सदर इसमाविरूद्धच्या हद्दपारीच्या कारवाईद्वारे अवैध गौण खनिज चोरीविरूद्ध तसेच शासकीय कर्मचारी यांना दमदाटी, मारहाण करणे अशा गुन्ह्यांतील आरोपींविरूद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले आहे.