पत्रकार संरक्षण कायद्याची कडक करण्याची मागणी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची  झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांत  खुपच वाढ झाली आहे. यासंदर्भात पुर्ण राज्यभर  शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत आहेत. या बाबत महाराष्ट्र पत्रकार संघ संचालित भडगाव तालुका पत्रकार संघ तर्फे भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद केले आहे की,पत्रकार बांधवांच्या संतप्त भावना आपण लक्षात घ्याव्यात. पुरोगामी राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. तसेच पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधत आहोत. शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करत आहोत.

आपण सदर निवेदनाची गांभिर्याने दखल घ्याल हिच अपेक्षा. निवेदनावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारी सदस्य- सोमनाथ पाटील, भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर शिवदास महाजन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कासार, प्रसिध्दी प्रमुख नितीन महाजन, अशोक परदेशी, संजय पवार, कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील, जावेद शेख, आर.के. मिर्झा, सुरेश कोळी, विजय पाटील, राजू शेख, यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री सो महाराष्ट्र, जिल्हाधिकारी सो, जळगाव, पोलिस अधीक्षक जळगाव यांना पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.