दिल्लीत भाजपाच्या जोरदार हालचाली..!

विधानपरिषदेच्या जागांवर झाली चर्चा : बावनकुळे, फडणवीस नड्डांच्या भेटीला

0

 

नवी दिल्ली

 

लोकसभा निवडणुकीत भाजपाला झटका सहन करावा लागल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे देखील समोर आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

विधानपरिषदेसोबतच मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अचानक दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे सांगितले जाते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, बैठकीत विधानपरिषदेच्या जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा झाली. राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होणार आहे. भाजप पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मात्र, यासाठी भाजपमधील 35 जण इच्छुक आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवारांची निवड करायची, हा पेच भाजप नेतृत्त्वासमोर आहे. यादृष्टीने दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

 

 

विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड करताना भाजपकडून काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो किंवा जे उमेदवार विधानसभेला प्रभाव टाकू शकतात, अशांनाच भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार

महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.