महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – डॉ. नरेंद्र पाठक

0

97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समित्यांची घोषणा

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर ;- अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता 72 वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे नियोजन सुरू आहे. आता पर्यंत जी 96 संमेलने झाली त्या पेक्षा हे संमेलन वेगळे ठरेल, असा विश्वास साहित्य संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी आज (3 रोजी) व्यक्त केला. अमळनेर येथे संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, संमेलनाचे संकेतस्थळाचे लोकार्पण झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी विविध समित्यांची घोषणा केली.

म. वा. मंडळाच्या कार्यालयाचे आज नांदेडकर हॉल, अमळनेर येथे डॉ पाठक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आता विषय संमेलनाचा किंवा मराठी साहित्याचा नाही तर आता अमळनेरच्या अस्मितेचा आहे. यामुळं आपण हे यशस्वी करूच, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. समाजातील वेगवेगळे घटक , सोशल मीडिया मुळे अनेक गैरसमज निर्माण होतात व त्यातून वाद होतात. मात्र यापासून दूर राहून हे संमेलन यशस्वी करून आपण आपला वारसा पुढे नेऊ, असेही ते म्हणाले.

खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे यांनी संमेलनाच्या निमित्ताने प्रताप महाविद्यालयात करण्यात येत असलेल्या कामांबाबत माहिती दिली. बजरंग अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संत सखाराम महाराज मंदिर संस्थानकडून संमेलनासाठी 5 लाखांचा निधी चेक स्वरूपात देण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्याम पवार यांनी केले. याप्रसंगी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार श्री सुराणा, म.वा मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, हेमंत बाळापूरे यांच्यासह शहरातील साहित्यिक, लेखक , कवी व मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.