अधिकारी संघटनेच्या सभासदांचे ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान – संचालक सुगत गमरे

0

मराविमं अधिकारी संघटनेचे ४५ वे अधिवेशन उत्साहात

जळगाव/धुळे/नंदुरबार , लोकशाही न्यूज नेटवर्क

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यात वित्त व लेखा,मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, दक्षता व सुरक्षा, जनसंपर्क आणि विधी या महत्वाच्या विभागाचे सदस्य आहेत. महाराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेची सदस्य संख्या ही या कंपन्यातील एकुण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अल्प असली तरी अधिकारी संघटनेच्या सभासदांचे ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असून व्यवस्थापनात त्यांची भूमिका या कंपन्यांसाठी श्वासाचे काम करते, असे प्रतिपादन अधिवेशनाचे अध्यक्ष तथा महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे यांनी केले.
अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या ४५ व्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनाचे उध्दाटन अमरावतीचे विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भुषण कुलकर्णी, महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रविण बागुल, सरचिटणीस संजय खाडे, संघटन सचिव प्रविण काटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना गमरे म्हणाले की, राज्यातील उर्जा क्षेत्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्याचे काम हे देशात सर्वोत्तम आहे. ऊर्जा क्षेत्रात पुढील काळात ५० हजार कोटीची कामे होणार आहेत. त्यातून ग्राहकाप्रती कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी प्रचंड वाढणार आहे. पदभरती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, प्रत्येक कुटूंबाशी नाते असलेला विभाग म्हणजे वीज विभाग. प्रचंड कार्यक्षमतेने काम करणारा हा विभाग आहे, असे मी मानतो. परंतू नागरीकांना या विभागाच्या तांत्रिक अडचणी माहीत नसल्याने टिका सहन करूनही प्रतिकूल स्थितीत काम करून ग्राहकांच्या मनात या विभागाने विश्वास निर्माण केला आहे.

भादीकर म्हणाले की, अधिवेशनाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांच्या भेटी होतात.अनेक विषयावर विचारमंथन होते. महावितरण ही शासकीय कंपनी आहे. वीज क्षेत्रात प्रचंड बदल होत असल्याने अंखंडीत व गतिमान सेवेसाठी कार्यक्षमतेने वसुली ही महावितरणची गरज आहे.

कुलकर्णी म्हणाले की, महावितरण ग्राहक सेवेशी संबंधीत असल्याने, बदलत्या काळानुरूप अधिकाऱ्यांनी टेक्नोसेव्ही व्हावे. अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यवस्थापनाकडून संपूर्ण प्रयत्न राहील, तर पॅरलल लायसन्सी, तसेच न सुटणाऱ्या प्रश्नाविरूध्द लढणे हा आमचा अधिकार आहे आणि अन्यायविरोधात आम्ही कायम लढणार असल्याचे मत संघटनेच्या अध्यक्ष प्रविण बागुल यांनी व्यक्त केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, कर्मचाऱ्यांवर असलेला अतीरिक्त कामाचा भार, पदोन्नती, नविन पदभरती, अपग्रेडेशनसारखे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचे मत संघटन सचिव संजय खाडे यांनी व्यक्त केले. दोनदिवसीय अधिवेशनाची सांगता पतसंस्थेच्या कामकाजानंतर करण्यात आली.
कार्यक्रमाला राज्यभरातून महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील राज्यभरातील सुमारे पाचशे अधिकारी या अधिवेशनाला उपस्थित होते. सूत्रसंचालन भाग्यश्री वानखेडे यांनी केले तर आभार सचिव फुलसिग राठोड यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.