पारस ललवाणीविरुद्ध विनयभंगाची फिर्याद नोंदवणाऱ्या ‘त्या’ तरुणीच्या आईला खंडणी घेताना अटक

0

जामनेर : येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या विरुद्ध काही महिन्यांपूर्वी विनयभंगाची फिर्याद नोंदवणाऱ्या अल्पवयीन तरुणीच्या आईला बुधवारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव जवळ ललवाणी यांच्याकडून २५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. जामनेर येथील प्रफुल्ल लोढा आणि सिल्लोड येथील सुनील कोचर यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीशी आपल्या पुतण्याचा विवाह करून दिला म्हणून जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, यांचे चुलत भाऊ आणि त्यांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. त्यात पारस ललवाणी यांच्यावर विनयभंगाचाही आरोप संबंधित मुलीने केला आहे. या प्रकरणात फिर्याद मागे घेण्यासाठी त्या मुलीच्या आईने पारस ललवाणी यांच्याकडे २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ती रक्कम लासलगाव जवळ टाकळी विंचूर शिवारातील ऐश्वर्या लाॅजवर भेटून देण्याचे ठरले होते. ही रक्कम देण्यासाठी पारस ललवाणी यांचे भाऊ अल्केश ललवाणी हे मंगळवारीच लासगाव येथे गेले. तिथे पोलिसांना त्यांनी या खंडणीच्या मागणीची माहिती दिली. २५ लाख रुपये रक्कम वाटावी म्हणून दोन हजार रुपयांच्या नोटांचे १० बंडल तयार करण्यात आले. त्याची वरची आणि खालची नोट खरी लावण्यात आली आणि उर्वरित कागदाचे तुकडे ठेवण्यात आले. अशा प्रकारे ५०० च्या नोटांचेही १० बंडल करण्यात आले. त्यात एकूण दोन हजाराच्या २० आणि ५०० च्या २० नोटा अशा एकूण ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा होत्या. नोटांवरून पोलिसांनी संबधित महिलेला ताब्यात घेतले. त्या सर्व नोटांचे क्रमांकही मंगळवारी रात्रीच लासलगाव पोलिसांकडे नोंदवण्यात आले.

पोलिसांना संकेत मिळताच लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहूल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्या लाॅजवर छापा टाकला आणि रक्कम स्वीकारताना संबंधित महिलेला रंगेहात पकडले. तिने जामनेर पोलिस ठाण्यात मुलीने दाखल केलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि फिर्याद मागे घेण्यासाठी पारस ललवाणी यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात खोटे जवाब देऊन अडकविण्याची धमकीही दिली होती, असे अल्केश ललवाणी यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या महिलेने दिलेल्या जबाबावरून जामनेर येथील प्रफुल्ल लोढा आणि सिल्लोड येथील या महिलेचा मानलेला भाऊ सुनील कोचर यांच्या विरोधातही या कटात सहभागी असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.