स्त्री कालची, आजची व उद्याची

0

संस्कृती व स्त्री या शब्दांमध्ये एवढी जवळीक आहे जसे दिवा आणि वात. सर्वप्रथम आपण ‘संस्कृती’ म्हणजे काय हे बघू. असे म्हटले जाते भूक नसताना खाणे ही विकृती भूक असताना खाणे ही प्रकृती आणि भूक असताना आपल्यातील अर्धी भाकरी दुसऱ्याला देणे ही संस्कृती. यातील संस्कृती या शब्दावरून स्त्री व संस्कृती या शब्दात किती जवळीक आहे व भावनिकता आहे हे कळलेच असेल.आकाशाप्रमाणे विशाल बुद्धी असणारी चंदनाप्रमाणे दुसऱ्यासाठी झिजणारी, चंद्राप्रमाणे शीतल असणारी गुलाबा प्रमाणे सुगंध देणारी, मनातले दुःख मनात ठेवणारी, हृदयात ओलावा असणारी, अंधारात प्रकाशाचे निरंजन घेऊन उभी असलेली,अशी ही कोण बरे असावी? ती म्हणजे स्त्री.

स्वामी विवेकानंद म्हणतात, स्त्रियांना मानाचे स्थान मिळायला हवे, जगातील सर्व प्रगत राष्ट्रे स्त्रियांना शिक्षण देऊनच पुढे आली.त्यांच्या शिक्षणाची सुरुवात चारित्र्य आणि विशुद्ध शीलाने झाली पाहिजे. त्यांनी  सहनशीलतेच्या जोडीला पराक्रमाची जोड द्यायला हवी. महर्षी कर्वे, म. फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया मजबूत केला या परिस्थितीतही यांनी कौटुंबिक संघर्ष यांना तोंड देत कुटुंब व कार्यक्षेत्र यातील तोल सांभाळला. आजही भारतात शासनाने एकीकडे समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्त्वांना मान्यता दिली असली  तरी घराघरातून मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद केला जातो. एकाच मातेच्या पोटी जन्म घेणाऱ्या अपत्त्यांना पक्षपातीपणाची वागणूक मिळते. स्त्रीया अर्थाजन करीत असतानाही घरातील कामाचा बोजा त्या एकट्या सांभाळत आहेत. परावलंबित्व, भावनांचा कोंडमारा, सहनशीलता, जमवून घेण्याची वृत्ती, प्रेमळपणा या गुणांच्या आधारावर त्या भावी जीवनाचे मनोरे उभे करतात.

स्त्री शिक्षण हे राष्ट्राच्या गतिशीलतेचं द्योतक आहे.मानवाच्या सुसंस्कृतपणाच प्रतीक आहे. मुलगी केवढी शिकली एवढ विचारून लोक आता थांबत नाही तर नोकरी कोणती करते, ती करिअर कशात करणार आहे, ही चौकशी केली जाते. आज भारतातील बड्या उद्योजक समूहाच्या कुटुंबातील मुली तर वडिलांच्या उद्योगात सक्रिय झाल्या असून त्यांनी स्वतःचं असं वेगळं प्रभुत्व निर्माण केल आहे. गार्गी, मैत्रेयी यांना तर त्या विदुषी म्हणून विद्वानांच्या सभेमध्ये मानाची जागा मिळत असे. स्त्रीया नवीन अस्त्रेही निर्माण करीत त्याला रामायणातही पुरावा आहे. म्हणूनच म्हटले जाते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता.

आजच्या  स्त्रीमध्ये शारदा सामावलेली आहे.

शा- शालीनता

र- रमणीयता

दा- दाहकता. आपल्या वाणीत नैतिकतेचे भान ठेवून त्या कार्य करीत असतात.  तो भाव तिच्या बोलण्यात आवाजात जाणवतो. गिलीगन यांच्या संशोधनात असे आढळून आले की, स्त्री भावनिक असतात, त्यांच्यात सहानुभूतीची भावना असते. जी चळवळ सावित्रीबाई फुले जोतीराव फुले महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली होती त्याचेच फळ म्हणून आज अंतराळवीर कल्पना चावला, किरण बेदी, सानिया मिर्झा,

पी.टी.उषा,बच्छेंद्री पाल या आहेत. नवीन पिढीला सन्मानाच्या पदापर्यंत पोहोचविण्यास स्व. इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, मदर टेरेसा यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. भारतीय संस्कृतीत स्त्री ही मूल्यांची पेरणी करते त्यामुळे आदराचे अंकुर फुटतात.शेवटी मी एवढेच सांगेल की,

या पुरुष प्रधान संस्कृतीत

तु उभी मोठ्या धैर्याने,

कित्येक वेळा दाखविले

सामर्थ्य तुझ्या कर्तृत्वाने…..

अनेक सोसलेस तू

क्रूर असे अत्याचार

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांचा व्याभिचार …..

घेऊन अपराध पोटात

देतेस प्रचिती अथांग मनात

वंदन तुझ्या समर्पणाला

मूर्ती तू वात्स्यल्याची…

यातना भोगण्यातच आम्ही जीवन नाही घालायचे

आम्हा योग्य तो सन्मान

देणे कर्तव्य आमुचे

देणे कर्तव्य आमुचे .

Leave A Reply

Your email address will not be published.