बीएचआरच्या घोटाळाप्रकरणी एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले,

0

जळगाव (प्रतिनिधी) ईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था, त्याचे प्रशासक व इतर अन्य ठिकाणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी एकाच वेळी छापे टाकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बीएचआरच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीएचआरमधील गैरव्यवहाराशी संबंधी २०१८ पासून दिल्लीसह राज्य सरकारकडे तक्रारी केलेल्या आहेत. तूर्त आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरु आहे. त्यांची कारवाई संपली की, सविस्तर बोलतो, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.  तसेच सर्व रेकॉर्ड देणार असल्याचं ही ते म्हणाले. दरम्यान आता कुणाची नावं समोर याचीच उत्सुकता असणार आहे.

आमदार, खासदार, माजी मंत्री यांचं रेकॉर्ड देणार

बीएचआर संदर्भातील शासनाकडे केलेल्या तक्रारीचा संपूर्ण पत्रव्यवहार देणार असून या संस्थेच्या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री यांचं रेकॉर्ड देखील आहे ते पण देणार असल्याचं खडसे यांनी सांगितले. ठेवीदारांचे हित जोपासणे, हा आमचा प्रमुख हेतू होता. अगदी खासदार रक्षाताई खडसे अॅड कीर्ती पाटील यांनी देखील याबाबत तक्रार केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरु आहे. ही कारवाई संपली की, सविस्तर बोलतो, असे खडसे म्हणाले.

१६०० कोटींचा घोटाळा?

हा घोटाळा काही हजार कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत एकट्या पुणे शाखेतच १६०० कोटींचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. राजकारणी आणि अधिकारी यांचे काळा पैसा दडवण्याचे केंद्र,कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार, अनेक कायदे आणि नियम यांचे सर्रास उल्लंघन असे अनेक गैरप्रकार केल्याचे आरोप या पतसंस्थेवर आहेत . भाई हिराचंद रायसोनी ही मल्टीस्टेट पतसंस्था असल्याने आणि मल्टीस्टेट क्रेडीट को – ऑपरेटिव्ह सोसायटीज् कायदा २००२ प्रमाणे अशा संस्थावर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त या पतसंस्थेवर कारवाई मात्र करू शकत नव्हते त्यामुळं सहकार आयुक्तांनी हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता.  बँकेच्या भागधारकांची आणि ठेविदारांची फसवणूक आहे. त्यामुळेच या धाडसत्रा नंतर अनेक राजकारण्यांचे आणि अधिका-यांचे धाबे दणाणले असावे.आता हे प्रकरण तडीस जाते की राजकीय साठमारीचा बळी ठरते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.