मलिदा लाटण्यासाठी नगरपालिकेची नियमबाह्य कामे

0

खामगाव (प्रतिनिधी) :– खामगाव नगर पालिकेमध्ये विकास कामाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार चालविला असून लोकहिताच्या कामांना महत्त्व न देता केवळ आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य दिले जाते.विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात असून सत्ताधारी मलिदा लाटण्यासाठी नियमबाह्य कामे करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केला. स्थानिक होटेल देवेंद्र येथे नगर पालिकेच्या विविध कामाच्या भ्रष्ट कार्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवेंद्र देशमुख यांनी सुरुवातीला लॉकडाउन च्या काळात खामगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तर खामगाव नगर पालिकेच्या गेल्या साडे तीन वर्षांच्या कार्यकाळात नगराध्यक्षा व सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांच्याच प्रभागात पुन्हा पुन्हा विकास कामे घेऊन विरोधकांच्या प्रभागाला विकासापासून वंचित ठेवले आहे. खामगाव शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची वल्गना करणाऱ्यांनी विकास कामातही राजकारण सुरु केल्याने शहराचा विकास भरकटत आहे. भारत कटपीस ते फरशी रोड, बिर्ला काँटसीनचे लीज प्रकरण, नगरोतथान विकास कार्यक्रमाची कामे यासोबतच इतर कामाबाबत त्यांनी परिस्थिती मांडत सत्ताधारी नियोजनशुन्य काम करीत आहेत त्यामुळे नगर पालिकेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन दोषींविरुद्ध कारवाईची मागणी यावेळी देवेंद्र देशमुख यांनी केली.पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे गोपाळराव कोल्हे, ऍड विरेंद्र झाडोकार, दिलीप पाटील, विजय कुकरेजा, आरीफभाई उपस्थित होते.

” हू आर यू ” वैभव डवरे”
खामगाव नगर पालिकेच्या कामात नगराध्यक्षा अनिता डवरे यांचे पती वैभव डवरे यांचा अपेक्षेपेक्षा जास्त हस्तक्षेप वाढला आहे.२६ जुलै रोजी झालेल्या नगर पालिकेच्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा अनिता डवरे या एखाद्या पुतळ्याप्रमाणे बसलेल्या होत्या तर पत्रकारांना नगर पालिकेच्या कामकाजाबाबत माहिती वैभव डवरे देत होते.त्यामुळे हू आर यू वैभव डवरे असा प्रश्न देवेंद्र देशमुख यांनी उपस्थित केला. सन्मानजनक नगराध्यक्षा पदाची गरिमा कायम ठेवण्यासाठी नगराध्यक्षा अनिता डवरे यांनीच समोर येणे गरजेचे आहे असा सल्ला यावेळी देशमुख यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.