जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करा!

0
जळगाव, (प्रतिनिधी)  – जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यु झाला आहे. तसेच कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी लॅब सुरु करावी अशी मागणी आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगितले.
  राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज व्हिसीव्दारे घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री श्री. पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपण ही मागणी केली असून यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा जेणेकरुन त्यास मान्यता देण्यात येईल. याकरीता आमदार स्थानिक विकास निधीतून पन्नास लाख रुपयेही देता येतील असे त्यांना बैठकीत सांगण्यात आले.
  या परिस्थितीमध्ये केशरी कार्डधारकांना धान्य देण्यासाठी शासन सकारात्मक  पाऊल उचलेल. पोलीसांवरील ताण कमी करण्यासाठी त्यांच्या मदतीला होमगार्डची नियुक्ती करावी. अशी मागणीही पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गरीब व गरजूंना भोजन मिळावे. याकरीता तालुका तेथे शिवभोजन केंद्र सुरु करण्यात येत आहे. या सर्व बाबींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हयात एक कोरोना पॉझीटिव्ह व्यक्ती मृत्यू पावली असून एक व्यक्ती आयसोलेटेड वार्डात ॲडमिट आहे. मध्यप्रदेश व गुजरात राज्याची सीमा जिल्ह्याला लागून असल्याने या सीमा बंद करण्यात याव्यात. यामुळे तेथील कोणीही इकडे येवू शकणार नाही, जेणेकरुन आपला जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होईल. केळी पीकाचे भाव लक्षात घेता याबाबतीत आपण जैन एरिगेशन सिस्टीमला विनंती करणार आहोत की, त्यांनी शेतक-यांची केळी घ्यावी. जेणेकरुन शेतक-यांना दिलासा मिळेल. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने पीपीई किटचा प्रश्न उदभवला आहे. तो दोन ते चार दिवसात सुटणार आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलिस पाटील, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना सुध्दा मास्क पोहोचविण्याचा निर्णय झाला.
  कोरोनाच संकट हे आपल संकट आहे असे मानावे. आपल्याला या संकटावर मात करायची आहे. यासाठी मी जनतेला आणि  विविध संस्थाना विनंती करतो की, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करावी. असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.