बडेजावपणाला फाटा देत आदर्श विवाह!

1

भुसावळच्या वाणी – नवलखे परिवाराचा पुढाकार : कुटुंबियांसोबत केला आनंद द्विगुणीत

जळगाव, दि. 17 –
लग्न समारंभात श्रीमंतीचा थाट दाखविणे हल्ली फॅशन होत आहे. लग्नात दाखविला जाणारा बडेजावपणाला फाटा देत भुसावळ येथील वाणी परिवाराने कुटुंबियांसोबत विवाहाचा आनंद द्विगुणीत करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विवाह नोंदणीच्या शासकीय कार्यालयात रितसर विवाह नोंदणी केली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नवदाम्पत्याला आशिर्वाद दिले आहेत.

भुसावळ येथील कै. डॉ. निळकंठ शांताराम वाणी यांचे चिरंजीव अमोल यांचा विवाह कै. गजेंद्र गोपालदास नवलखे यांची कन्या सुषमा हिच्याशी नुकताच शासकीय पद्धतीने नोंदणी करून साजरा झाला. प्रत्येक लग्नात धार्मिक विधिना फार महत्व असते. जेवनावळी, रुखवंत, मंडप सजावट, निमंत्रक पत्रिका, मिरवणूक या गोष्टींसाठी वारेमाप खर्च केला जातो. हा सर्व खर्च टाळून लग्नातील वारेमाप खर्चाला लगाम लावण्यात आला.

नियमानुसार रितसर एक महिन्या पूर्वी अर्ज करुन सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि चि. अमोल व चि.सौ.का सुषमा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात १५ जून रोजी विवाह नोंदणी करून विवाहाचा बंधनात अडकले. यावेळी नोंदणी अधिकारी सहायक सब रजिष्टर- विवाह अधिकारी श्री किरण चौधरी यांनी नवदाम्पत्याना शपथ दिली दोघांनी एकमेकांना पुष्पहार घालून आणि पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. दोन्ही परिवाराच्या वतीने सब रजिस्टर- विवाह अधिकारी किरण चौधरी यांचे विनोद अजनाडकर यांनी पुष्प गुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधीकारी कार्यालय परिसरात दोन्ही परिवारातील मोजकेच निमंत्रित सदस्य उपस्थित होते. या आदर्श विवाहनंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नव दाम्पत्याला आशिर्वाद देवून समाजाची सेवा घडो अशा शुभेच्छा दिल्यात. यावेळी सहाय्यक दुय्यम निबंधक के.पी. चौधरी, सब रजिष्टर श्री. कंखरे , शामकांत कुलकर्णी, सुधीर जोशी, मिलिंद बोदडे , अरुण कुलकर्णी आदींनी शुभेच्छा दिल्या .

विवाह सोहळयाला केवळ धार्मिक नाही तर सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. दोन कुटुंबात अतूट नाते व आत्मियता निर्माण करण्याचा महत्वाचा हेतू त्यात आहे. सर्वसाधारण समाजाला आदर्श होईल अशी विवाह पद्धत या निमित्ताने अमलात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाणी व नवलखे परिवाराने विवाहानंतर भुसावळ येथे एका छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सर्वच धर्मात प्रथेनुसार कुटुंबीय मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी करत असतात. लग्नाच्या वेळी खरेदी, रोशनाई, स्वादीष्ट पदार्थाची रेलचेल असते. तसेच ऐन विवाहाच्यावेळी मानपानावरून रुसवेफुगवे, खाद्यपदार्थाची नासाडी या सर्व बाबी होत असतात. हे सर्व टाळण्यासाठी सरळ-सरळ न्यायालयात जाऊन विवाह करायचा नंतर छोटेखानी प्रीतिभोज देऊन कुटुबातील सदस्यांचे एकत्रिकरणावर वाणी परिवराने भर दिला आहे. .चितोडे वाणी समाज जळगाव शहरचे उपाध्यक्ष विनोद अजनाडकर यांच्या पुढाकाराने हा आदर्श विवाह संपन्न झाला. समाजाच्या पारंपरिक रूढी परंपरा प्रथेला फाटा देऊन काहीतरी वेगळे तेही आदर्श घेण्यासारखे केल्याने आणि चितोडे वाणी समाजाच्या इतिहासात कित्तेक वर्षानंतर नोंदणी पद्धतीने विवाह झाल्या मुळे अजनाडकर, वाणी, नवलखे सर्व परिवाराचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

1 Comment
  1. Raju Suresh Kharul says

    Great

Leave A Reply

Your email address will not be published.