हुश्श…औरंगाबादमध्ये करोनाबाधित महिलेने जन्म दिलेल्या बाळाला करोना नाही

0

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये करोनाबाधित महिलेने जन्म दिलेल्या चिमुकलीला करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झाले आहे. या आनंदवार्तेने महिलेच्या कुटुंबासह आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास टाकला आहे.

मुंबईहून औरंगाबादेत आलेल्या या महिलेला करोनाची लागण झाल्याचं काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती त्यामुळे गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. तिची प्रसुती करण्याचं आव्हान घाटी रुग्णालयातील डॉक्टरांसमोर होतं. तिला भूल देणंही अवघड होतं. हे आव्हान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ व भूल तज्ञांनी यशस्वीरित्या पेलले. काल (शनिवार 18 एप्रिल) या महिलेची डिलेव्हरी झाली. कोरोनाबाधित महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र, तिच्या बाळाच्या करोनाची टेस्ट करण्यासाठी प्रसूतीनंतर बाळाचे रक्ताचे नमुने तसेच गर्भजल व व्हजायनल स्वॅब घेण्यात आला. त्याचे रिपोर्ट आज आले असून या बाळाला करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

बाळाचे ‘कोरोना’ अहवाल आज निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागात आनंदाची लाट पसरली. पुढचे काही दिवस बाळाला आईपासून दूर ठेऊन संगोपन केलं जाणार आहे. आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर चिमुकलीला आईकडे सोपवलं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.