सुकाणू समिती : एक मार्चपासून राज्यात असहकार आंदोलन

0

कोल्हापूर –

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली, पण या कर्जमाफी योजनेतून आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे. सरकारने कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून याचा निषेधार्थ एक मार्चपासून राज्यात असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील व शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीची बैठक टेंबरोड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, ‘राज्य सरकारने कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली. ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केलेली असताना केवळ १४ ते १५ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. पात्र असूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक विवेंचनेत सापडला आहे. सरकारने पाठवलेल्या ग्रीन यादीमध्ये प्रचंड प्रमाणात त्रुटी असून अनेक धनदांडग्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असून पात्र शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे सरकारची योजनाच फसवी निघाली असल्याचा आरोप करत सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी असहकार आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाची सुरुवात इस्लामपूर (जि. सांगली) येथून होणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कोणत्याही प्रकारचे कर देणार नसल्याचा ठामपणे सांगितले.’

‘१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबासह जीवनयात्रा संपवली. याची सरकारला आठवण करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्यात येणार आहे. २३ मार्च हा दिवस शेतकरी हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येणार असून राज्यातील प्रमुख शहरांतून या दिवसी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.’ यावेळी माजी आमदार पवार-पाटील यांनी जिल्ह्यातील कर्जमाफीचा आढावा घेतला. बैठकीस अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, माणिक शिंदे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.