सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यात घेण्याची शक्यता

0

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बारावीच्या परीक्षा जुलै महिन्यात आयोजित करु शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सीबीएसई बारावीच्या परीक्षा 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान घेणार असल्याची माहिती आहे. सीबीएसईतर्फे बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येण्याची शक्यता आहे. सीबीएसईतर्फे या परीक्षेचं आयोजन दोन टप्प्यात होणार असल्याची देखील माहिती आहे. पहिला टप्पा 15 जुलै ते 1 ऑगस्ट आणि दुसरा टप्पा 8 ते 26 ऑगस्ट असा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक झाल्यांनंतर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या जात आहेत, अशी घोषणा केली होती. तर, त्यावेळी बारावी परीक्षांबद्दलचा निर्णय 1 जून रोजी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. सीबीएसई आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय येत्या अंतिम निर्णय 1 जून रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय बैठकीनंतर बारावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्य सरकार आणि राज्य परीक्षा बोर्डांकडून अभिप्राय मागवला आहे. राज्यांनी त्यांचा बारावी परीक्षा संदर्भातील सविस्तर अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पाठवण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.