साडेदहा लाखांच्या धनादेशाचे गौडबंगाल!

0

                                          धानोरा सेंट्रल बँकेचा प्रताप : लाभार्थी झिजविताय् बँकेचे उंबरठे
धानोरा, ता. चोपडा दि. 13 –
निराधार व्यक्तींना आधार ठरणार्‍या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या अडीच महिन्यांपासून पगाराचा छदामही मिळालेला नसून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या धानोरा शाखेने तब्बल 10 लाख 30 हजार 800 रुपयांच्या धनादेशाची काशी केली आहे. लाभार्थ्यांची यादी व धनादेश तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतरही तो वटविण्यात आला नसून याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. लाभार्थ्यांची हेडसांड करणार्‍या बँकेच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत असे की, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर निधी वितरीत करण्यासाठी चोपडा तहसील कार्यालयाकडून धानोरा सेंट्रल बँकेला दि. 8 मे 2018 रोजी 10 लाख 30 हजार 800 रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. या धनादेशासोबत लाभार्थ्यांची यादी देखील अदा केली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात हे पैसे पडले असून लाभार्थी मात्र वंचित आहेत. धानोरा सेंट्रल बँकेने हा धनादेश चोपडा येथे न वटविता जळगाव येथील कार्यालयात पाठविला. हा धनादेश जळगाव येथे दिल्यापासून अद्यापही वटलेला नसून तो गहाळ झाल्याचे आता समोर येत आहे. धानोरा येथील सेंट्रल बँकेच्या अनागोंदीचा कळस म्हणजे हा धनादेश एसबीआय बँकेच्या चोपडा शाखेचा असताना देखील तो वटविण्यासाठी जळगावला पाठविला. मुळात गेल्या 8 मे पासून या धनादेशाबद्दल स्थानिक बँक प्रशासन अनभिज्ञ असून या संदर्भात तहसीलदार दीपक गिरासे यांनी दोन वेळा पत्रव्यवहार करुनही त्याची माहिती देण्यात आलेली नाही.
अनागोंदी कारभाराचा कळस
येथील बँकेत रोज नवनवे किस्से घडत असतात. बँकेचा एकंदरीत कारभार ढिसाळ झाला असून कर्मचार्‍यांवर कुणाचाही वचक नसल्याने ते मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. गेल्या महिनाभरापासून लाभार्थी पैशांसाठी बँकेचे उंबरठे झिजवित असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.
पत्रव्यवहाराला केराची टोपली
लाभार्थ्यांची यादी व धनादेश याबाबत तहसीलदार दीपक गिरासे यांनी बँकेला दोन वेळा पत्रव्यवहार केला मात्र बँक व्यपस्थानकाने या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. लाभार्थ्यांची यादी देखील गहाळ झाल्याची चर्चा आहे.
…अन् धनादेश हरपला
दि. 8 मे रोजी अदा करण्यात आलेला धनादेश सुरुवातीला वटविण्यासाठी हेलपाटे घालत होता त्यानंतर तर हा धनादेश हरविला असल्याचा कांगावा आता करण्यात येत असून याबाबत अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे विशेष!

गेल्या महिन्यातच लाभार्थ्यांची यादी व धनादेश बँकेला अदा करण्यात आला. आमच्या खात्यात तसेच पैसे पडून असल्याने बँकेला पत्र पाठविले मात्र त्यांनी खुलासा सादर केलेला नाही. याबाबत पुन्हा बँकेला पत्र पाठविले आहे. बँक व्यवस्थापकाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे. लाभार्थ्यांना त्वरीत पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.
– दीपक गिरासे, तहसीलदार

लाभार्थ्यांचा धनादेश मिळाला, तो अद्यापही वटलेला नाही. जळगाव येथील कार्यालयात पाठविला असता तो गहाळ झाला आहे, याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दिलेली नाही.
– सौरभ साकेत,
बँक व्यवस्थापक

Leave A Reply

Your email address will not be published.