सलग एकविसाव्या दिवशी इंधन दरात वाढ ; जाणून घ्या आजचा भाव

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग एकविसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. मुंबईत शनिवारी पेट्रोल २३ पैशांनी महागले आहे. त्यामुळे पेट्रोलचा भाव ८७. १४ रुपये झाला आहे. शुक्रवारी तो ८६.९१ रुपये होता. डिझेलचा भाव ७८.७१ रुपयांवर गेला आहे. कालच्या तुलनेत डिझेल २० पैशांनी वधारले. शुक्रवारी मुंबईत डिझेलचा भाव ७८.५१ रुपये होता. मागील २१ दिवसांत पेट्रोल ९ रुपये तर डिझेल ११ रुपयांनी महागले आहे.

दिल्लीत शनिवारी पेट्रोल ८०.३८ रुपये झाला. त्यात २५ पैशांची वाढ झाली. शुक्रवारी पेट्रोलचा भाव ८०.१३ रुपये होता. तर डिझेलमध्ये आज २१ पैशांची वाढ झाली आणि डिझेलचा भाव ८०.४० रुपयांवर गेला आहे. गुरुवारी दिल्लीत डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली होती. कोलकात्यात आज पेट्रोल ८२.०५ रुपये झाला. त्यात २३ पैशांची वाढ झाली. तर चेन्नईत पेट्रोलचा दर ८३.५९ रुपयांवर गेला आहे. कोलकात्यात डिझेल ७५.५२ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.६१ रुपयांचा स्तर गाठला आहे.

देशातील पेट्रोल डिझेलचे भाव जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्या इंधन दर निश्चित करत असतात.सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या महिनाभरात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल ४० डॉलरच्या पुढे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.