सर्पमित्रालाच कोब्राचा दंश; कोब्राला घेऊन सर्पमित्र थेट रुग्णालयात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरसोली येथे घराजवळ निघालेल्या कोब्रा नागाला पकडत असताना, नागाने सर्पमित्राला दंश केल्याची घटना समोर आली आहे. कोब्रा या अतिविषारी नागाने दंश केल्यानंतरही सर्पमित्राने न घाबरता, नागाला पकडून स्वत: रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याने नागाला घेऊन तब्बल 10 किमीचा प्रवास दुचाकीने केला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित सर्पमित्राची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

सर्पदंश झालेल्या सर्पमित्राचं नाव सुधीर जगन्नाथत सपकाळे आहे. सुधीर हा भाऊबीजेसाठी शिरसोली याठिकाणी आपल्या बहिणीकडे गेला होता. दरम्यान रविवारी सकाळी बहिणीच्या घराशेजारी अतिविषारी कोब्रा नाग निघाला. यावेळी सर्पमित्र सुधीर सपकाळे याने नागाला पकडण्याचा प्रयत्न केला.

मात्र  यावेळी कोब्राने सुधीरच्या उजव्या पायाला दंश केला. दंश केल्यानंतरही सुधीरनं कोब्राला पकडलं. यानंतर संबंधित दंश केलेल्या कोब्राला सोबत घेत सुधीर स्वत: दुचाकी चालवत दहा किमी दूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात पोहोचला आहे. साडे अकराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करून घेतलं आहे.

त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  कोब्रा सापाचा दंश झाल्याने सुधीरला चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, रक्ताच्या उलट्या होणे असे विविध त्रास झाले आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नागाचं 20 टक्के विष सुधीरच्या शरीरात गेलं असून 24 तासानंतरच सुधीर धोक्याबाहेर येऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या सुधीरच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.