समिक्षा साहित्य निर्मितीसह लेवा बोलीचे संवर्धन व्हावे

0

पहिल्या लेवागण बोली साहित्य संमेलन परिसंवादात मान्यवरांचा सूर

जळगाव दि. 24-
कवयित्री बहिणाबाई चौधरींनंतरच्या व्ही. बी. कोलते, भालचंद्र नेमाडे आदी साहित्यीकांनी मराठी साहित्यात लेवा बोली शैली वापरली हे त्यांचे धारिष्ट्य होते. आपण लेवा बोलीत लिहितो याचा अभिमान आहे. मात्र लेवा गण बोलीशैलीत साहित्य निर्मिती व्हावी, समिक्षा, समिक्षण व्हावे, यासह लेवा गण बोलीशैलीचे संवर्धन व्हाव, असा सूर मान्यवरांच्या साहित्यातील लेवा बोलीशैली याविषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नि. रा. पाटील होते.
पहिल्या राज्यस्तरीय लेवा गणबोली साहित्य संमेलनाला रविवारी सकाळी 11 वा. लेवा भवनात उभारण्यात आलेल्या साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सुरुवात झाली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डोंबिवली येथील ज्येष्ठ साहित्यीक डॉ. राम नेमाडे यांनी भुषविले. संमेलनाचे मुख्य आयोजक कवी तुषार वाघुळदे यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष डॉ. अरविंद नारखेडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन लेवा गणबोली साहित्य संमेलनाची गरज व्यक्त केली. यावेळी क.ब.चौ. उमविचे कुलगुरु पी.पी. पाटील, कादंबरीकार डॉ. राजन गवस(कोल्हापूर), पुणे येथील सावित्रीबाई विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर जाधव, माजी महापौर विष्णू भंगाळे, गुगलचे इंजिनियर आशिष चौधरी(हैद्राबाद), ज्येष्ठ लेखिका डॉ. आशालता कांबळे आदींची उपस्थिती होती. राज्यातील विविध भागांसह गुजराथ मधील सिल्व्हासा, वापी, मध्यप्रदेशातील इंदौर, भिलाई, भोपाळ येथील लेवा गणबोलीचे उपासक एकत्र आले होते. यावेळी 16 लेखकांच्या ग्रंथांचेही प्रकाशन करण्यात आले.
नाव जातीवाचक मात्र खान्देशची बोली- डॉ. नि.रा. पाटील
लेवागण बोली शैली असे जातीवाचक नाव असले तरीही लेवा बोली शैलीही खान्देशची बोली शैली असल्याचा गौरव डॉ. नि. रा. पाटील यांनी केला. लेवा समाजाचा गुजराथ ते महाराष्ट्राचा प्रवास कसा घडला? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
मळभ दूर व्हावे- काशिनाथ बर्‍हाटे
लेवा बोली शैली ही सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. साहित्य संमेलनातून मळभ दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हावे. लेवा बोलीशैलीची प्रतिष्ठा, स्वाभिमान, सत्व वैविध्यपुर्णता स्वतंत्र अस्तित्व जगासमोर मांडले पाहिजे. लेवा बोलीशैली तावडी बोली शैली असल्याच्या मुद्यावर तावडी बोली शैलीचे स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचे स्वागत करतो मात्र आपली भाषा थोपणे योग्य नाही, असे मत परतवाडा येथून आलेल्या काशिनाथ बर्‍हाटे यांनी व्यक्त केले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु व्ही.बी. कोलते यांच्या साहित्यातील लेवाबोलीचा संदर्भ या विषयावर ते बोलत होते.
सांस्कृतिक वारशासाठी संमेलने आवश्यक- डॉ. अविनाश ढाकणे
भावी पिढीला पूर्व इतिहास समजावा, सांस्कृतिक वारसा, साहित्य, कला, पाककला याबाबत अवगत व्हावे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले. परिसंवादादरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी संमेलनस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासह शामसुंदर पाटील उपस्थित होते. त्यांच्याहस्ते निवेदिका प्रणिता झांबरे, गायिका ज्योती राणे यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. नि. रा. पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, शामसुंदर पाटील यांना लेवा गणबोली शब्दकोष देवून सत्कार करण्यात आला.
लेवागण बोलीला तावडी म्हणू नका- प्रा. डॉ. कमल पाटील
भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यातील लेवागण बोलीला तावडी म्हणू नका,अ्रसे अवाहन प्रा. डॉ. कमल पाटील यांनी केले. लेवा बोलीला अमृताची गोडी आहे. तिला अहिराणी म्हटले जाते. पण तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. भालचंद्र नेमाडेंच्या सहा कादंबर्‍यांमधून वही गित, विवाह गीत, बाल गितात, लेवा बोली दिसते.
बहिणाबाईंच्या साहित्यातून सकारात्मक विचार- डॉ. संजय पाटील
लेवागण बोली शैली व वर्‍हाडी बोलीत साम्यावर बोलताना दोन्ही भाषा या भगिनी आहेत. त्याचप्रमाणे बहिणाबाई व वर्‍हाडीतील रुक्मिणी पाटील (मलकापूर) यांच्या साहित्यातील साम्यता त्यांनी दाखविली. सिंधुताई भंगाळे (फैजपूर) यांनी श. रा. राणे यांच्या साहित्यातील लेवा गण बोलीबाबत विचार मांडले.
डॉ. नारखेडेंनी नाट्यछटा लेवा बोलीत आणला- प्रशांत धांडे (हिंगोणा)
डॉ. अरविंद नारखेडे यांच्या साहित्यातील नाट्यछटांची तुलना दिवाकरांशी करत दोघांच्या नाट्यछटा वैशिष्ट्यात साम्य आढळून येते. नाट्यछटा हा प्रकार प्रमाणभाषेतून काढून बहुजन लेवा बोली शैलीत आणण्याचे श्रेय डॉ. अरविंद नारखेडेंना असल्याचे मत प्रशांत धांडे यांनी व्यक्त केले. बहिणाबाईंच्या कवितांचे भाषांतर जगातील सर्व भाषात झाले असल्याचे मत डॉ. देवबा पाटील (खामगाव ) यांनी व्यक्त केले.
साहित्यीकांकडून लेवा बोलीचा आदर- प्रा. संध्या महाजन
साहित्यीक अ. फ. भालेराव व सुकलाल चौधरी या बिगर लेवा साहित्यीकांनी त्यांच्या भालेराव यांच्या शापोआ व चौधरी यांनी दान पावलं या साहित्यकृतीत लेवा बोली शैली वापरुन भाषेचा आदर केल्याचे मत प्रा. संध्या महाजन यांनी मांडले. तर शोभाताई नाफडे (मलकापूर) यांनी कोलते, भालचंद्र नेमाडे यांनी लेवा बोली साहित्यात वापरुन धारिष्ट्य दाखविले आहे. लेवा बोलीत साहित्य, समिक्षा व्हावी, भाषेचे संवर्धन व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
अन्यथा मराठी प्रमाण्य हरवेन- रमेश सुर्यवंशी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपण भांडत आहोत, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आधी बोलीभाषांना कवेत घ्या अन्यथा मराठी भाषा प्रमाण्य हरवून बसेल,बोली भाषांना जवळ केले तर मराठीचा शब्दकोष मोठा होईल.असे मत चाळीसगाव येथे भरलेल्या अ. भा. अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश सुर्यवंशी यांनी मांडले.
यावेळी डॉ. पुष्पा गावीत यांनी बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय या कवितेचे आदिवासी भिल्ल भाषेत रुपांतर सादर केले.
मी जातीचा नाही मात्र मातीचा- अ. फ. भालेराव
मी लेवा जातीचा नाही मात्र मातीचा आहे असा उल्लेख करुन चार कादंबर्‍या लेवा बोलीत लिहिल्या असल्याची माहिती साहित्यीक अ. फ. भालेराव यांनी दिली. सैराट हा सिनेमा बहुजनांच्या भाषेतून निर्माण झाल्याने त्याला यश मिळाले. साहित्याची मातीशी नाळ घट्ट असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच रविंद्र पांढरे यांनी जामनेरी बोलीचे वेगळेपण दाखवून दिले. दक्षिण जळगावात जामनेरी जामनेर या सिमावर्ती तालुक्यात बोलली जात असल्याचे मत व्यक्त केले.
असू द्या… असू द्या.. ने श्रोते लोटपोट
लेवा गण बोलीच्या उत्तरार्धात लेवा बोलीतील कथाकथन व नाट्यछटा हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधु भंगाळे होत्या. यावेळी लिलाताई गाजरे (ठाणे) यांनी गेला मुहुर्त कुणीकडे, रवि पाटील (डोंबिवली) यांनी लेवा पोरांनी घेतली शप्पथ, विनोद इंगळे (पुणे) यांनी जानबाई, डॉ. अरविंद नारखेडे यांनी हाव माय खरी गोठ आदी नाट्य छटा सादर केल्या तर व. पु. होले यांनी सादर केलेल्या असू द्या… असू द्याने उपस्थित श्रोत्यांना लोटपोट केले. त्यांनंतर निमंत्रित कविंच्या कविसंमेलनाचा कार्यक्रम सादर केला. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी अ. सु. पाटील (घाटकोपर) हे होते. यावेळी कवी पंकज पाटील, गणेश जावळे, मोहन वायकोळे, पुष्पा कोल्हे, डॉ. मिलिंद धांडे, संगिता चौधरी, योगिता नेमाडे, लिलाताई गाजरे,रवी पाटील, कविता लोखंडे, वंदना चौधरी, प्रल्हाद कोलते, सुनिता येवले, विनोद इंगळे, अध्यक्ष अ. सु. पाटील यांनी कविता सादर केल्या. यावेळी लेवा बोलीत चित्रपट निर्मिती दिग्दर्शन करणार्‍या उत्पल चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.