समग्र प्रगतीसाठी निष्ठा ठरणार लाभदायी – प्रा. शैलेश पाटील

0

भुसावळ येथे निष्ठा प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ

भुसावळ (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी केंद्राच्या एनसीईआरटीने सतरा मोड्यूल तयार केले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हे प्रशिक्षण लाभदायी ठरणार असल्याचे प्रतिपादन जळगाव येथील डायटचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांनी येथे केले.

भुसावळ येथे पहिल्या टप्प्यातील निष्ठा प्रशिक्षणास प्रारंभी ते बोलत होते. भुसावळ केंद्र शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील पहिली ते आठवीला शिकवणार्‍या सर्व शिक्षकांसाठी आयोजित निष्ठा प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये प्रारंभ झाला. प्रशिक्षणाला उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते होते. प्रशिक्षणाचे भुसावळ तालुका संपर्क अधिकारी तथा अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनाचा हेतू सांगून शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण एक पर्वणी ठरणार असल्याचे सांगितले. तालुका समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी प्रशिक्षण कार्यवाहीबाबत सांगितले. गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून संजय गायकवाड, जितेंद्र पाटील, वंदना भिरूड, अरुण सोनवणे, गोपाल बाणाईत मार्गदर्शन करणार आहेत. यशस्वीतेसाठी नाबीद खाटीक, देवानंद वाघधरे, विशेष शिक्षक सोनवणे परिश्रम घेत आहेत. पाच दिवसीय प्रशिक्षणाचा हा पहिला टप्पा असून त्यात एकशे पन्नास शिक्षक सहभागी झाले आहेत. दुसर्‍या टप्प्यात देखील पाच दिवसीय प्रशिक्षण होणार आहे. यात भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे व नगरपरिषदेचे शंभर टक्के मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.