संपूर्ण देशाला हादरवणारी घटना ; भंडारा जिल्हा रुग्णालयात १० बालकांचा होरपळून मृत्यू

0

भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिटमध्ये घडली आहे. रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा होरपळून मृत्यू झालाय.  शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 बालकांना वाचवण्यात यश आले आहे.

शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. रात्रीच्या वेळी रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिले असता त्या कक्षात मोठ्या प्रमाणात धूर होता. तिनं लगेचच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रशासनानं तातडीनं हालचाल करून अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जिथं आग लागली होती, त्या विभागात आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचले. तर, आऊट बाॅर्न युनिटमधील दहा मुलांचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर रुग्णालयात प्रचंड गोंधळ झाला. मृत बालकांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यांच्या दु:खाला पारावार उरला नव्हता. या सगळ्यांना आवरणे कठीण झाले होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तात्काळ रुग्णालयात धाव घेतली व संपूर्ण घटनेची माहिती घेतली. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.