संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यश वाघाचा मृत्यू

0

मुंबई | प्रतिनिधी 

मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील यश या वाघाचा कर्करोगानं मृत्यू झाला आहे. नॅशनल पार्कमधल्या टायगर सफारीमधला यश हा एक आकर्षणाचा बिंदू होता.  त्याच्या चेहऱ्यावरील गाठीवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर गाठीच्या उती तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या.  यशचा जन्म २००८ मध्ये झाला होता. हा वाघ म्हणजे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र होता. यश वाघाचं आज शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात कॅन्सरमुळे या वाघाचं वजन घटल्याचं स्पष्ट झाल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षकानं सांगितलं. यशवर मार्चमध्ये एक शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला खालच्या ओठाच्यावर गाठ आढळून आली होती. मार्चमधील शस्त्रक्रियेदरम्यान ही गाठ काढून टाकण्यात आली होती. त्याचे विश्लेषण करण्यात आले असता यशला एब्रियॉनल रॅब्डोमायोसर्कोमा झाल्याचे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून सांगण्यात आले होते. या आधीही त्याच्यावर ऑगस्टमध्ये गाठ आढळून आल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यावेळी गाठ ही कॅन्सरची नसल्याचे समोर आले होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता उरलेले वाघ
बसंती – 16 वर्षे
आनंद – 9 वर्षे
लक्ष्मी – 9 वर्षे
बिजली – 9 वर्षे
मस्तानी – 9 वर्षे

 

Leave A Reply

Your email address will not be published.