श्री संत सेना महाराजांची जयंती आज प्रथमच जळगावात होणार साजरी

0

जळगाव –  महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई अंतर्गत श्री संतसेना नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर तर्फे श्री संतसेना महाराजांची जयंती उत्सव जळगावात प्रथमच 16 मे रोजी सरदार वल्लभभाई पटेल मंगल कार्यालय सभागृहात होणार असल्याची माहिती श्री संतसेना हितवर्धक संघाच्या पदाधिकार्‍यांनी लोकलाइव्हच्या लोकसंवादात दिली.

लोकलाइव्हचे संचालक राजेश यावलकर यांच्याशी पदाधिर्‍यांनी दिलखुलास चर्चा केली. या चर्चेत मुंबई नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष व रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष किशोर जगन्नाथ सुर्यवंशी, नाभिक संघाचे अध्यक्ष जगदिश निकम, सचिव अनील निकम सहभागी झाले होते.

किशोर सुर्यवंशी :- महाराष्ट्र नाभिक मंडळ जवळ-जवळ 28 वर्षापासून कार्यरत असून समाजाच्या विविध समस्या सोडवत आहे. कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत असून समाजाची प्रगल्भतेकडे वाटचाल सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे पुण्यतिथी प्रमाणेच सेनाजींची जयंती का साजरी करू नये, यावर चर्चा करण्यात येवून सर्वांच्या सहमतीने जयंती उत्सवाचे नियोजन करण्यात आले व 16 मे रोजी कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले आहे.आमचा नुकताच 15 एप्रिल रोजी भडगाव येथे समाज प्रबोधन मेळावा नानाभाऊ शिरसाठ याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यात समाजातील जुन्या चालिरिती व विविध त्रासदायक बाबींवर चर्चा करण्यात येवून विषय पारित करण्यात आले. या मेळाव्यात समाजातील आहेर, मराठा, तायडे, दखनी, मारवाडी, गुजराथी,गुजर या पोटजातीतील रोटी-बेटी व्यवहार सुरू करणे, लग्न  समारंभात आहेर घेणे-देणे प्रथा बंद व्हावी साखरपुड्यातच विवाह करणे की त्यायोगे तो पैसा बचत होवून वरांच्या भवितव्यात कामी येईल.वरातीत महिलांनी नाचू नये, पुरूषांनी मद्य सेवन करू नये,विवाह वेळेवर लावणे,विवाह समारंभात सत्कार बंद करणे, जिल्हा पातळीवर  वधू-वर मेळावे घेणे, घटस्फोटाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हास्तरावर न्याय निवारण समिती व पैशांअभावी शिक्षण घेऊ न शकणार्‍यांसाठी आर्थिक विकास मंडळाची स्थापना करावी, यासह 19 विषयावर चर्चा करून पारित करण्यात आले. समाजाचे बारा बलुतेदार मंडळ असून आम्हाला राजकिय पाठबळ नसल्याने समाज शासनाच्या विविध योजनांपासून दुर्लक्षित झाला आहे. विधानसभा, लोकसभेतही आमच्या प्रतिनिधी असावा यासाठी आमचा प्रयत्न असून लोकप्रतिनीधींनी याची दखल घ्यावी. शिवशाहीपासून ऐतिहासिक परंपरा असलेला नाभिकांचा वारसा लाभला आहे समाजाचे हुतात्मेही होवून गेले आहेत. . समाजाने प्रत्येक क्षेत्र पादक्रांत केले आहे.प्रत्येक समाजाचा संपर्क आमच्या समाजाशी येतो.

सेना महाराज कोण होते? 

अनिल निकम :- सेना महाराज कोण होते? – साधारण बाराव्या, तेराव्या शतकात मध्यप्रदेशात विषमतेविरूध्द बंड पुकारणारे नाभिक समाजाचे राष्ट्रसंत, शिरोमणी, सेनाजींचा जन्म मध्यप्रदेशातील उमरीया जिल्ह्यातील बांधवगड या गावी वैशाख वद्य व्दादशी रविवार विक्रम संवत1357 या दिवशी  झाला.बांधवगड हे अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात विलासपूरकडे एक फाटा जातो. त्या फाट्यावर उमरिया नावाचे स्टेशन आहे तिथून  एक गड दिसतो, तो गड म्हणजेच बांधवगड होय!

महाराष्ट्राशी भावनिक संबंध ठेवून परप्रांतात जाऊन राहिलेले अनेक कुटुंब होते. सेनाजींचे वडिलही त्यापैकी एक होते.बांधवगड  एक वैभवशााली नगर होते.नगराचा राजा रामराजा यांच्या दरबारी सेनांजीचे वडिल देविदासपंत राजकीय सल्लागार व विज्ञानवादी वैद्य होते. एके दिवशी देवपूजेत मग्न असतांना राज सेवेस   उशिर झाल्याने राजाने रागाने त्यांना बंदी बनवून  आणण्याचे फर्मान केले.सेनाजींवरील संकट ओळखून स्वत: प्रभू पांडुरंगाने सेनाजींचे रूप धारण करून राजांची सेवा केली. सेवा करत असतांना राजाला चमेलीच्या वाटीत प्रभूंचे चतुर्भूज रूप दिसले.इकडे सेनाजी देवपूजेमधून बाहेर आले व राजाच्या सेवेस आले असता राजाने त्यांना सकाळी वाटीतले रूप दाखविण्याचा आग्रह केला असता ही सर्व प्रभूंच्या लिला असल्याचे उमगले राजालाही यामागील रहस्य समजताच सेनाजींचे चरण धरून  त्याचवेळी सेनाजींचे शिष्यत्व पत्करले ती प्रथा आजही सुरू आहे.

जयंती कार्यक्रमाची रूपरेषा- जगदिश निकम:- 16 मे रोजी दुपारी 1 वाजता सेंट्रल मॉल बीगबाजार येथे श्री संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन -आरती होवून सेनाजींची पालखी नेहरू चौक,टॉवरचौकातून वाद्यवृदांसह सनईच्या मंगल निनादात मिरवणूक निघेल मिरवणूकीत कलशधारी महिला, घोडेस्वार राहतील. चित्राचौक,बेंडाळेचौक, पांडेचौकातून मार्गक्रमण करीत मिरवणूक पटेल सभागृृहात येईल. सभागृहात प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वागत सोहळा होऊन महिलांमधून लकी ड्रॉ काढून 20 महिलांना मान्यवरांच्या हस्ते साड्या दिल्या जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.