शैक्षणिक धोरणाची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी आवश्यक ; अॅड. रवींद्रभैय्या पाटील

0

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित परिसंवादात डॉ. जगदीश पाटील व डॉ. मनिषा जगताप यांनी साधला संवाद

भुसावळ (प्रतिनिधी) :- गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण क्षेत्रावरही त्याचा विपरीत परिणाम झाला असल्याने यापुढे शिक्षण व आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून त्याचा लाभ सर्वांना मिळावा याकरिता त्याची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जळगाव जिल्हा केंद्रातर्फे आयोजित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित परिसंवादात उद्घाटनपर मनोगतात जळगाव जिल्हा केंद्राचे अध्यक्ष ॲड. पाटील बोलत होते. प्रारंभी परिसंवादाचे समन्वयक श्यामकांत रूले मुक्ताईनगर यांनी आयोजनाचा हेतू सांगून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी शालेय शिक्षण या विषयावर बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचार व सृजनशक्तीला वाव देण्याबरोबरच त्यांची अध्ययन निष्पत्ती व क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने धोरणात नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांनी मागील दोन्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा आढावा घेऊन नवीन धोरणाची ध्येय व वैशिष्ट्ये सांगितली. सार्वत्रिक प्रवेश, नवीन शैक्षणिक रचना, पायाभूत शिक्षण, अभ्यासक्रम, मूल्यमापन, महत्त्वाची क्षेत्रे, बहुभाषिकत्व याविषयी कस्टम अॅनिमेशनद्वारे पीपीटी सादरीकरण केले. त्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. डॉ. मनीषा जगताप यांनी उच्च शिक्षण या विषयावर संवाद साधताना मागील धोरणांचा उच्च शिक्षणासंदर्भात आढावा घेऊन नवीन शैक्षणिक धोरणात झालेले आमूलाग्र बदल सांगितले. समाजाभिमुख व कौशल्यावर आधारित उच्च शिक्षण देऊन रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊलवाट निर्माण केली जाणार आहे. नवीन धोरणामुळे शैक्षणिक विकास व विविध रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यासंदर्भातही त्यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. परिसंवादाविषयी प्रा. श्रीकांत जोशी यावल, डी. के. पाटील रावेर व अनिता पाटील जामनेर यांनी शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी सदरचा परिसंवाद लाभदायी ठरला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

जळगाव जिल्हा केंद्राचे सचिव प्रा. डॉ. सुनील पाटील यांनी परिसंवादातील माहितीमुळे शैक्षणिक धोरणाचे विश्लेषण झाल्याचे सांगून अशा प्रकारचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने राबविणार असल्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन परिसंवाद समन्वयक श्यामकांत रूले मुक्ताईनगर यांनी तर आभार सचिव प्रा. डॉ. सुनील पाटील जळगाव यांनी मानले. झूम ॲप व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पार पडलेल्या या वेबिनार परिसंवादाचा हजारो श्रोत्यांनी लाभ घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.