शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018-19 पासून या अभियानात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य शासनामार्फत 60:40 टक्के याप्रमाणे आहे.

क्षेत्रविस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, अपारंपारिक क्षेत्रावर कडधान्य, क्षेत्र वृध्दी व उत्पादकतेत वाढ करणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य तर नगदी पिकांत कापसाचा समावेश आहे.

या अभियानात पीक प्रात्यक्षिके, पीक पध्दतीवर आधारीत प्रात्यक्षिके (आंतरपिक) इ., प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य, एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधन, पीक पध्दतीवर आधारीत प्रशिक्षण, शेतकऱ्यांचे शेतमालाचे मुल्यवर्धनासाठी मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी), बीज प्रक्रिया संच (FPO साठी) इ. घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी केली जाते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य नगदी पिके सन 2021-22 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करुन अर्ज करावेत. महा-डीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांसाठी कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.