शेतकऱ्यांना खुशखबर : यंदा समाधानकारक पाऊस

0

नवी दिल्ली । यंदाच्या पावसाबद्दल सर्वांनाच धाकधूक असताना भारतीय हवामान खात्याने सोमवारी पावसाविषयी दिलासादायी वर्तमान दिले आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शुभ वर्तमानामुळे शेतकर्‍यांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे़ या अंदाजामध्ये ५ टक्के कमी-अधिक फरक गृहित धरला आहे़ ‘एल निनो’विषयी काही दिवस खूप चर्चा आहे़ सध्या तो कमजोर पडला असून, त्याची स्थिती मान्सूनच्या काळात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे़ हिंदी महासागरातील स्थिती स्थिर असून, मान्सूनच्या काळात ती अनुकूल होण्याची शक्यता आहे़ हा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील डिसेंबर, जानेवारीचे तापमान, दक्षिण भारतीय महासागरातील समुद्राचे फेब्रुवारीतील तापमान, पूर्व आशिया सागरी स्तरावरील फेब्रुवारी-मार्चचा दबाव आदी प्रमुख पाच घटकांचा विचार करण्यात आला आहे.

दरवर्षी येणार्‍या मोसमी पावसाबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होतो. म्हणून त्याचे प्रमाण किती व कसे असेल याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते. देशात यावेळी 7 टप्प्यांत लोकसभा निवडणूक होत असून सर्वत्र आचारसंहितेचा अंमल सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून अनुमती मिळाल्यावर भारतीय हवामान खात्याने आज दुपारी या वर्षीच्या मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.