शहादा येथे युवक महोत्सवाला प्रारंभ

0

शहादा-  शेतकरी आत्महत्या, बहिणाबाईंची गाणी, अवयवदान, समलिंगीचा स्वीकार, देहदान, नारी शक्ती, व्यसनमुक्ती, आजचा वारकरी, रस्ता सुरक्षा, पर्यावरण, सर्जिकल स्ट्राईक, छत्रपती शिवाजी महाराज, गड-किल्ले संवर्धन, छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक, असे असंख्य  विषय,देखावे,फलक याद्वारे हाताळत तरुणाईने अवघ्या शहादेकरांचे मन जिंकत युवारंग युवा महोत्सवातील पहिला दिवस गाजवला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार १६ जानेवारी पासून शहादा येथे विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ८ वाजल्या पासून संघाचे आगमन महाविद्यालयाच्या प्रागंणात सुरु झाले. या महोत्सवात सहभागी झालेल्या महाविद्यालयांच्या पथसंचलनास दुपारी २ वाजता महात्मा फुलेचौकातून प्रारंभ झाला. पथसंचालनाला पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली.  यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, युवारंग कार्याध्यक्ष दीपक पाटील, प्रा.नितीन बारी, प्राचार्य लता मोरे, सहसंचालक सतिश देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ.सत्यजित साळवे, अधिसभा सदस्य अमोल मराठे, दिनेश नाईक, दिनेश खरात, नितिन ठाकूर  आदी उपस्थित होते.

समाजातील असंख्य विषयांवर तरुण पिढीने अत्यंत संवेदनशीलपणे देखावे, फलक तर काहींनी सादरीकरण करत विविध मार्गांनी ही पिढी व्यक्त होत असल्याचा संदेश लोकांना दिला. अत्यंत जल्लोषात या पथसंचलनात विद्यार्थी, विद्यार्थिंनी कलाकार सहभागी झाले होते. यावेळी काहींनी पारंपारिक वेष परिधान केले होते. त्या मध्ये नऊवारीसाडी, धोतर व आदिवासी पेहराव यांचा समावेश होता.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ५० महाविद्यालयाच्या संघानी पथ संचलनात सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, रस्तासुरक्षा अभियान, पर्यावरण, व्यसनानिधनतेचे परिणाम,  व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, सोशल मिडियाच्या आहारी  गेलेली पिढी, कॅन्सरला आळा, राष्ट्रीय साक्षरता आदीं द्वारे जनजागृतीचा संदेश नागरिकां पर्यंत पोहोचविला. काही महाविद्यालयांनी ट्रॅक्टर, घोडा या वाहनांवर सजीव देखावे सादर केले.

शहाद्याच्या महात्मा फुले चौकातील कृषीभवना पासून पथसंचलनाला सुरुवात झाली.  बसस्थानक, नगरपालिका चौक, खेतीया रोड, येथून पथसंचलन जात असतांना रस्त्याच्या दूतर्फा तरुण, तरुणी अबाल व वृध्दांनी प्रचंड गर्दी केली होती. शिवछत्रपती ग्रुप, संकल्प ग्रुपच्या वतीने पालिका चौकात व  जमीअत उलेमाच्यावतीने  शोभायात्रेत सहभागी झालेल्या  कलावंतांचे शीतपेय देऊन स्वागत करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता या पथसंचलनाची सांगता झाली. पथसंचलनाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी रॅलीच्या मार्गावरील कचरा वेचून जमा केला.  

८० स्वयंसेवकांची टिम:  राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. व जिमखान्याचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी आहेत.  

 शुक्रवार दि.१७ जानेवारी रोजी युवक महोत्सव युवारंगचे उदघाटन सकाळी ९ वाजता आनंदयात्री पु.ल.देशपांडे रंगमंच क्र.१वर माजी अध्यक्ष, अणु उर्जा आयोग, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील राहतील. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमलाताई पाटील, प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील उपस्थित राहतील. उदघाटना नंतर रंगमंच क्र.१(आनंदयात्री पु.ल.देशपांडे) वर मिमिक्री, दुपारी २ वाजता रंगमंच क्र.१(आनंदयात्री पु.ल.देशपांडे) वर विडंबन नाट्य, रंगमंच क्र.२ (गायक सुधीर फडके) वर भारतीय लोकगीत, रंगमंच क्र.३ (लोक शाहीर अण्णाभाऊ साठे) वर काव्य वाचन, रंगमंच क्र.४ (गीतकार ग.दि.माडगुळकर) वर शास्त्रीय वादन (सुरवाद्य), रंगमंच क्र.५ (लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल) वर रांगोळी ह्या कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.