शहर विकासाला पुन्हा राजकारणाचा कोलदांडा!

0

सहा महिन्यापूर्वी जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या एक हाती सत्ता आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शहराच्या विकासाकरिता भरीव असा निधी उपलब्ध होवून जळगाव शहराचा खुंटलेला विकासाला गती मिळेल असे सर्वांनाच वाटले होते. परंतु सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. 6 महिन्यात काहीही विकास कामे होवू शकले नाहीत. सहा महिने संपल्यावर तसेच पावसाळा संपल्यानंतर विकास कामाला गती मिळेल ही अपेक्षा सुध्दा फोल ठरते आहे. कारण भाजपमधील फुटीर अनेक नगरसेवकांची घर वापसी होत असून पुन्हा महापालिकेत भाजपचे वर्चस्व निर्माण होत आहे.

महापौर उपमहापौर हे शिवसेनेचे असले तरी सर्वाधिक नगरसेवक भाजपचे असल्याने महापौर-उपमहापौर यांचेवर अविश्वास ठराव दाखल करण्यास कायद्याने अडचण आहे. अन्यथा महापौर-उपमहापौर यांचेवर अविश्वास ठराव दाखल करणेस कायदेशिर अडचण येत असली तरी महापालिकेत भाजपचे बहुमत असल्याने प्रत्येक बाबतीत भाजपने शिवसेनेला कोंडित पकडण्यात येईल. त्यामुळे शहरातील विकास कामांना भाजप खिळ बसेल. त्यामुळे शिवसेनेचे महापौर-उपमहापौर असले तरी ते शोभेचे पद राहील. त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापरच करता येणार नाही.

महापालिकेत झालेले सत्तांतर म्हणजे पोरखेळ म्हणता येईल. भाजपची साथ सोडून शिवसेने बरोबर जाणारे नगरसेवक जरी म्हणत असतील का शहराच्या विकासाची कामे होत नसल्याने आम्ही भाजपची साथ सोडून शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे समाधान करण्यासाठी हे नगरसेवक बोलत असतील तर त्यांच्या कोलांट उड्यामागे अर्थाचे राजकारण दडलेले आहे हे शेंबडं पोरगही सांगू शकेल. त्यामुळे विकासाच्या मुद्यांवर आम्ही भाजपला सोड चिठ्ठी दिली असे म्हणणे संयुक्तीक राहणार नाही. आता 6 महिन्यात त्यांना काय उपरती झाली की, भाजपच्या कारकिर्दीत विकासकामे होत होती. याची हा सर्व भ्रम पसरविण्याचा प्रकार आहे. आगामी निवडणुकीत जळगाववासिय या नगरसेवकांना त्यांची जागा दाखवून देतील एवढे मात्र निश्चित.

जळगाव महापालिकेत तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत खान्देश विकास आघाडी 35 वर्षांची असलेली सत्ता उलथून टाकली आणि भाजपच्या पदरात भरभरुन मतदान केले. एकूण 75 नगरसेवकांची संख्या असलेल्या महापालिकेत 57 भाजपच्या नगरसेवकांना निवडून देऊन विकासकामे करण्याची संधी दिली त्यानंतर जळगाव शहराचे आमदार म्हणून सुध्दा राजूमामा भोळे यांना प्रचंड मंतानी विजयी केले. त्यानंतर आमदार भोळेंनी शहर विकासाला गादी द्यायची असेल तर आपल्याच घरात त्यांच्या सौभाग्यवतींना महापौर करण्याचा आग्रह धरुन बसले. आ.राजुमामा भोळेंच्या पत्नींना महापौर करण्यासंदर्भात भाजपमधील नगरसेवकांच्या एका मोठ्या गटाचा तीव्र विरोध होता. परंतु सर्व बाजूंनी विचार करून तत्कालिन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राजूमामा भोळेंच्या पत्नी सौ.सीमा भोळे यांना संधी दिली. प्रसंगी अनेक भाजप नगरसेवकांचा त्यांनी रोष ओढवून घेतला.

तब्बल दिड वर्षाचा कालावधी संपला तरी विकासकामांचा पत्ता नाही. आमदार आणि महापौर एकाच घरातले असून सुध्दा विकास कामे का होत नाहीत याबाबत जोरदार चर्चेला उत आले. केवळ टक्केवारीवर लक्ष केंद्रीत असल्याने विकास कामे होत नाहीत हे भाजपच्या नगरसेवकांच्या लक्षात आले. नगरसेवकांनी सौ.सीमा भोळे यांना आपल्या महापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला. सौ.सीमा भोळे यांचे जागी नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे यांची वर्णी लागली. भारती सोनवणे यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत जनसंपर्क वाढवून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न होवू लागला.

भारती सोनवणेंचे पती कैलास आप्पा सोनवणेंकडून कामचुकार अधिकाऱ्यांची कान उघडणी केली गेली. शहर स्वच्छतेचा ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीला धारेवर धरले. भल्या पहाटे वॉर्डात जावून अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले. परंतु मध्येच भाजपाच्या नगरसेवकांनी दगाफटका केला आणि अडीच वर्षाच्या कालावधीनंतर महापौर-उपमहापौर निवडणुकीत फुटून शिवसेनेला साथ देवून जळगाव मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवला आता पुन्हा घरवापसीकडे वाटचाल सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.