# व्हिडीओ : जिल्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘पाया`तील दगड होणार! – आ. शिरीशदादा चौधरी

0

काम करण्याची मर्यादा निश्चित झाली तर मेगा रिचार्ज प्रकल्पाला विरोध नाही

जळगाव(प्रतिनिधी)  : रावेर-यावल तालुक्यासाठी वरदान ठरू शकणाऱ्या मेगा रिचार्ज प्रकल्पाला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागणार असले तर त्या प्रकल्पाची उपयुक्तता काय? कामाची कालमर्यादा निश्‍चित असेल तर प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, तोपर्यंत केळी उत्पादक जगेल का? असा सवाल करत शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर मेगा रिचार्ज प्रकल्प ऐवजी बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करणे जास्त संयुक्तीक असल्याचा दावा रावेरचे नवनर्विचित आमदार शिरिष चौधरी यांनी केला. जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून कॉग्रेसच्या भंगलेल्या मंदिराचे पुर्ननिर्माण करण्यासाठी या मंदिराच्या पायातील दगड होण्याची आपली तयारी असल्याचे आ.चौधरी म्हणाले. ‘कॉफी विथ लोकशाही` निमित्त रंगलेल्या चर्चात ते बोलत होते.

काँग्रेस विचारांचा संघावर विजय

विधानसभा निवडणूकी आधी रंगलेल्या चर्चावरही आ.चौधरी यांनी दिलखुलासपणे मते मांडली. राज्यभरात भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे वातावरण तापले होते. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या माझ्या दोन मित्रांकडून भाजपा प्रवेशाबाबत आग्रह सुरू झाला. भाजपात आला तर आमदारकी सहज मिळेल. केंद्र, राज्यात सत्ता असल्यामुळे विकासकामे करता येतील असा या मित्रांचा आग्रह होता. मी शांतपणे विचार केला. पारतंत्र्यात असतांना महाराष्ट्रात आजोबा धनाजीनाना यांनी कॉग्रेस रूजवली, वडील स्व.मधुकरराव चौधरी यांनी यावर कळस चढविला. बाळासाहेबांनी आपल्या कार्यकाळात रावेर, यावलसह संपूर्ण जिल्ह्याचा विकासासाठी मेहनत घेतली आणि शास्वत विकास साधला. याउलट काँग्रेसने काहीच विकास केला नाही असा दावा करणाऱ्या भाजपात गेलो तर सर्वात आधी त्यांचा विचार मान्य करावा लागला असता आणि ही माझ्या उज्ज्वल इतिहासासोबतची प्रतारणा ठरली असती. चौधरी कुटूंबियांचा इतिहास पुसून आमदारकी पदरात पाडली तर काय हाशील? असा प्रश्‍न मी संघातील त्या  मित्रांना केला आणि कॉग्रेस सोडणार नाही असे सांगितले. अशा पध्दतीने निवडणूकी आधीच काँग्रेसच्या विचारांनी संघांवर विजय प्राप्त केल्याचे आ. चौधरी म्हणाले.

जनसंपर्क, जमिनीवरील विकासकामांमुळे विजय

विजयाची खात्री होती. 2009 मध्ये अपक्ष  असतांना विजयश्री मिळविली होती. यावेळी आपण मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे केली. तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साहही प्रचंड होता. मात्र, 2014 मध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवातून खूप काही शिकायला मिळाले. शैक्षणीक संस्थांच्या गुणवंता वाढीसाठी वेळ देता आला. कार्यकर्त्यांशी संपर्क वाढला. जनतेच्या सुख दु:खात सहभाग वाढला. यामुळे विजयाची पायाभरणी झाली आणि भाजपाच्या लाटेतही विजयश्री खेचण्याची ताकद मिळाली असे आ.चौधरी यांनी सांगितले.

शाश्‍वस्त विकास हवा

भाजपाचे मावळते आ.हरिभाऊ जावळे यांनी कोट्यावधींची विकासकामे  केल्याचा दावा केला. मात्र, मतदारसंघात कुठेही जनतेला हा विकास दिसलाच नाही. शेवटी जनता माझ्या पाच वर्षापूर्वीच्या केलेल्या कामांची तुलना करू लागली आणि येथेच भाजपाचा पराभव निश्‍चित झाला. याउलट मेगा रिचार्ज प्रकल्पाला आपण बंद उपसा सिंचन योजनेचा पर्याय ठेवला आणि तो जनतेला योग्य वाटला.

काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देणार

आजोबा स्व.धनाजीनाना चौधरी यांनी महाराष्ट्रात  काँग्रेसला रूजविली. वडील स्व.बाळासाहेब चौधरी यांनी कॉग्रेसच्या मंदिरावर कळस चढविला. दुर्देवाने आता कॉग्रेसची अवस्था जिल्ह्यात अतिशय दयनिय झाली आहे. पराभूत मानसीकतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. पक्षापेक्षा नेता मोठा झाला आहे. मात्र, मला काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. यासाठी मी पायातील दगड होण्यासही तयार असल्याचे आ.चौधरी म्हणाले. जिल्ह्यात काँग्रेसने एकच जागा लढविली आणि आपण ती जिंकून दाखविली. निर्धार आणि धैय्य निश्‍चिती असल्यास यश निश्‍चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करावा लागणार आहे. काँग्रेसचे विचार आजही जिवंत असून कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण झाला तर इतिहासाची पूर्नरावृत्ती नक्की होईल आणि ती मी करणारच असा निर्धार शेवटी त्यांनी बोलून दाखविला.

याप्रसंगी चर्चेत प्रभातदादा चौधरी, लोकशाहीचे संचालक राजेश यावलकर, सल्लागार संपादक धों.ज.गुरव, निवासी संपादक भरत चौधरी, व्यवस्थापक सुभाष गोळेसर,  मोरेश्वर सोनार आदींनी सहभाग घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.