वैद्यकीय प्रवेशासाठी नविन आरक्षणचा मुस्लीम विद्यार्थ्यांनाही लाभ – भाजपा अल्पसंख्याक मोर्चा         

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी ओबीसी समाजास २७ टक्के व आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा अभूतपूर्व असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील मुस्लीम समाजाला उच्च शिक्षणात न्याय देणारा असून, यामुळे मुस्लीम समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीला न्याय मिळेल याचा विश्वास व आनंद व्यक्त करत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. शहेबाज शेख यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले  आहे.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या या निर्णयाने दरवर्षी हजारो मुस्लीम विद्यार्थी हे आपले वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. सब का साथ सबका विकास या मोदी सरकारच्या धोरणानुसार मनमोहन सिंग सरकारच्या काळात २० लाख मुस्लीम विद्यार्थ्यांना मिळत असलेला केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीचा फायदा आज मोदी सरकारच्या काळात आज २ कोटीहुन अधिक मुस्लीम विद्यार्थ्यांना मिळत आहे.

मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी स्पर्धा परीक्षेत फार थोड्या संख्येने मुस्लीम उमेदवार पात्र होत असत. परंतु आता मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, शासकीय सेवा आदी स्पर्धात्मक परिक्षांसाठी तयारी करण्यासाठी अनेक माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याने स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांचे प्रमाण आता वाढले आहे.

तसेच मुद्रा योजनेतून अनेक मुस्लीम युवकांना आपला स्वयंम उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकांकडून कर्जपुरवठा सुरळीत झाला आहे. त्याच बरोबर मुस्लीम महिलांना ही अनेक महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत लाभ मिळाला असून, मुस्लीम समाजाची ही सर्वांगीण प्रगतीकडे आगेकूच असल्याचे ही प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.शहेबाज शेख  यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.