विरोधकांना विकासकामे करून उत्तरे द्या – माजी मंत्री खडसे

0

भुसावळ (प्रतिनिधी )- अमृत योजना व कोरोना संकटामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना उशीर झाला मात्र आता शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरूवात झाली असून टप्प्या-टप्प्याने सर्वच भागात कामे होतील व विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही, विरोधकांना विकासकामे करून उत्तर द्या, त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर चांगले करून दाखवा, असा सल्ला माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाच्या सत्ताधार्‍यांना येथे दिला. विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत दोन कोटी 98 लाख 58 हजार 812 रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ जुना सातारा भागातून खडसे यांच्या हस्ते सोमवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, नगरसेवक मुकेश पाटील, गिरीश महाजन, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार आदी उपस्थित होते.

खडसे म्हणाले की, अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना विलंब झाला व अमृत योजनेच्या ठेकेदाराचे अजिबात लाड पुरवू नका, त्यांना दंड करा, अशा सूचना मी नेहमीच केल्या. मागच्या कालखंडात शहरात विजेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता व अवाजवी बिले काढली जात होती मात्र भाजपा सत्तेत आल्यानंतर एलईडी दिवे लावून उर्जा बचतीसह वीज बिलात मोठी बचत झाल्याचे ते म्हणाले. रस्त्यांच्या कामांना आता वेग देण्याची गरज असून आमदारांमुळे शहरात ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमुळे सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामे होत नसल्याने नागरीक नगरसेवकांना जाब विचारतात त्यामुळे कामे होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात स्वच्छतेच्या बाबतीत तक्रारी असल्याने त्याबाबतही त्यांनी नगराध्यक्षांना सूचना केल्या. भुसावळातील विकासाबाबत आपण अजूनही समाधानी नाही मात्र निश्‍चित सुधारणा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.